

सावंतवाडी: युती झाली असती, तर आपण या निवडणुकीत राज घराण्याला आपण पाठिंबा दिला असता. आता मात्र मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप करत माजी मंत्री, आ. दीपक केसरकर यांनी सावंतवाडीकर जनतेचे माझ्यावर प्रेम आहे, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अॅड. नीता सावंत- कविटकर यांच्यासह माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, परीक्षित मांजरेकर, खेमराज ऊर्फ बाबू कुडतरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. केसरकर यांनी आपल्या पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह सर्व पॅनलला निवडून देण्याचे आवाहन सावंतवाडीकर जनतेला केले.
भाजप नेते नितेश राणे यांनी आज भाजपच्या प्रचारसभेत “ये अंदर की बात है, दीपक केसरकर हमारे साथ है..!!” असे विधान करून खळबळ उडवली होती. यावर केसरकर यांनी सावध पवित्रा घेतला. त्यांनी या वक्तव्यावर थेट प्रतिक्रिया देणे टाळले, मात्र सावंतवाडीकर जनतेने मला चार वेळा आमदार म्हणून निवडून दिले आहे, जनतेचे प्रेम माझ्यावर आहे. अशाप्रकारे गैरसमज पसरवले जात असून याला जनतेनेच मतपेटीतून उत्तर द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
30 नोव्हेंबरला उपमुख्यमंत्री सावंतवाडीत येणार
शिवसेना-भाजपा यांची राज्यात युती असून निधी वाटपाबाबत प्रमाण ठरले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नगरपरिषदांना मोठा निधी देण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण पालकमंत्री आहोत आणि आपल्या हातात तिजोरीच्या चाव्या आहेत, अशा प्रकारचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, सावंतवाडी नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी 30 नोव्हेंबरला सावंतवाडी येथे येत असल्याचे आमदार केसरकर यावेळी बोलताना सांगितले.