

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सफेद रंगाची नंबर प्लेट असलेल्या गाड्या स्वतः शासन भाड्याने बेकायदेशीर रित्या वापरत आहे. यावर उपप्रदेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून कारवाई करण्यास कसूर केली जात आहे. तरी कर्तव्यात कसूर करणार्या उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करावा, तसेच अशा गाड्या भाड्याने घेणार्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी निरवडे येथील श्रीमती गावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर लक्षवेधी आंदोलन सुरु केले आहे .
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र शासन अंतर्गत असणारी कार्यालय व जिल्हा परिषद प्रशासन बेकायदेशीर रित्या सफेद रंगाच्या गाडीची नंबर प्लेट असणार्या गाड्या भाड्याने वापरत आहेत. अशा गाड्या परमिटच्या नसल्यामुळे भाड्याने वापरता येत नाहीत. मात्र आम जनतेला कायदा दाखविणारे व कायदा निर्माण करणारे, शासन व प्रशासन स्वतःच बेकायदेशीर रित्या सफेद रंगाच्या नंबर प्लेटच्या गाड्या भाड्याने घेऊन कायद्याची पायमल्ली करीत आहे.
याकडे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डोळेझाक करत आहेत. तरी सफेद नंबर प्लेटच्या गाड्या भाड्याने घेणार्या कार्यालय प्रमुखांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग व परिवहन निरीक्षक यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाई प्रस्तावित करावी, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकार्यांना सादर करत त्यांच्या कार्यालासमोर श्रीमती लक्ष्मण गावडे यांनी आंदोलन सुरू केले आहे.