

मडुरा : रोणापाल माऊली मंदिर समोरील वळणावर एसटी व दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात पाडलोस-भाकरवाडी येथील गणेश भास्कर गावडे (25) हा युवक गंभीर जखमी झाला. त्याच्या उजव्या पायावरून एसटीचे चाक गेल्याने पायाला गंभीर दुखापत झाली आहे. स्थानिकांनी त्याला तातडीने गोवा बांबोळी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. हा अपघात सोमवारी सकाळी 10.15 वा. सुमारास घडला.
गणेश गावडे हा मडूरा तिठा येथून मोटारसायकलने पाडलोस- भाकरवाडी येथे घरी येत होता. त्याचवेळी निगुडे ते मडुरे जाणार्या एसटीची माऊली मंदिर समोरील वळणावर त्याच्;या दुचाकीशी जोरदार धडक झाली. यामुळे तो दुचाकीवरून रस्त्यावर पडला. याचवेळी एसटीचे चाक त्याच्या पायावरून गेल्याने गणेशाच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली.
स्थानिकांनी त्याला गोवा-बांबोळी येथे उपचारासाठी हलविले. रोणापाल पोलीस पाटील सौ. निर्जरा परब यांनी बांदा पोलिसांना अपघाताची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी अपघाताचा पंचनामा केला. गणेश याचे काका विलास पांडुरंग गावडे (65) यांनी याबाबतची बांदा पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून एसटी चालक मोतीराम सातप्पा कांबळे (रा. चंदगड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.