

Sindhudurg Liquor Seizure
ओरोस : सिंधुदुर्गनगरी येथे मुंबई-गोवा महामार्गावर हॉटेल राजधानीसमोर एका टेम्पोमधून 55 लाख 75 हजार 600 रुपयांची गोवा दारू व सुमारे 25 लाख रुपये किमतीचा टेम्पो असा सुमारे 80 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी टेम्पोचालक व अन्य एक अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली.
गोवा दारूची चोरटी वाहतूक रोखण्याकरिता जिल्हा पोलिस अधीक्षक व अति. पोलिस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनांनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणची दोन विशेष पथके पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केली होती. ही दोन्ही पथके महामार्गावर पेट्रोलिंग करीत असताना एक टेम्पो गोवा दारूची गोवा ते मुंबई अशी वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती पथकाचे पोलिस उपनिरीक्षक समीर भोसले यांना मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन्ही पथकांनी महामार्गावर सिंधुदुर्गनगरीत महामार्गावर सापळा रचला.
या दरम्यान महामार्गावरून जाणारा अशोक लेलॅण्ड कंपनीचा एक टेम्पो दिसून आला. पथकातील कर्मचार्यांनी सदर टेम्पो थांबवला. गाडीतील मालाबाबत चालकाकडे विचारणा केली असता त्याने असंबंध उत्तरे दिली. मात्र त्याला पोलिसी पद्धतीने विश्वासात घेत चौकशी केली असता त्याने गाडीमध्ये गोवा दारुचे बॉक्स असल्याचे व ही दारू मुंबई येथे नेत असल्याचे सांगितले.
यानंतर पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता, टेम्पोच्या हौद्यात गोवा दारूच्या विविध ब्रॅण्डचे बॉक्स सापडून आले. पोलिसांनी ही सर्व दारू तसेच अशोक लेलॅण्ड कंपनीचा टेम्पो जप्त केला.ही कारवाई पजिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अति. अधीक्षक कृषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर, उपनिरीक्षक समीर भोसले, गणेश कन्हाडकर, सायबर पोलिस ठाण्याचे रामचंद्र शेळके, सहा. उपनिरीक्षक सुरेश राठोड, हेड कॉन्स्टेबल डॉमनिक डिसोझा, सदानंद राणे, प्रकाश कदम, किरण देसाई, बस्त्याव डिसोझा, जॅसन घोन्साल्वीस ॉन्स्टेबल महेश्वर समजिस्कर यांनी केली.
बाजारभावा नुसार या दारूची किंमत 55 लाख 75 हजार 680 रू. एवढी असल्याचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी सांगितले. या विनापरवाना दारू वाहतूक प्रकरणी टेम्पो चालक राघोबा रामचंद्र कुंभार(35, रा. पेडणे-मावसवाडी-गोवा) व त्याचा सहकारी मिलींद राणे (रा. इन्सुली, ता. सावंतवाडी) या दोघांवर सिंधुदुर्गनरी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला.