

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, दमट हवामानामुळे अंगाची काहिली होत आहे. जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा २३ अंश सेल्सियस ते ३५ अंश सेल्सियस असा आहे. ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यात अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर पावसाचे सावट निर्माण झाले आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज दिल्याने आंबा, काजू बागायतदारांबरोबरच शेतकरी व नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
जिल्ह्यात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण आहे. परिणामी, हवेत दमटपणा वाढला असून, सकाळी ९ वा. पासूनच अंगाची काहिली होते, अशी परिस्थिती आहे, सायंकाळी ५ वा. पर्यंत अशीच स्थिती असते. आंबा, काजू बागायतदारांसाठी हे वर्ष निराशाजनक राहिले आहे. यावर्षी प्रचंड धुके आणि ढगाळ वातावरणामुळे मोहोर करपल्याने १० ते १५ टक्के आंबा, काजू उत्पादन आले नाही. आता शिल्लक राहिलेले उत्पादन तरी शेतकऱ्यांच्या हाती येईल, याची शाश्वती सध्याच्या वातावरणामुळे राहिलेली नाही.
जिल्ह्यात एकीकडे वाढलेल्या
तापमानामुळे आंबा पिकात प्रचंड फळगळ आणि आंबा करपण्याचे प्रकार सुरू आहेत. त्या संकटात सापडलेल्या आंबा बागायतदारांसमोर आता पुढील चार दिवस पावसाचे संकट उभे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. जिल्ह्यात १२ ते २२ एप्रिल या कालावधीत पावसाचा अंदाज आहे. पावसाच्या शक्यतेने आंबा बागायतदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सध्या शिल्लक आंबा पिकांची काढणी सुरू झाली आहे.
परिपक्व फळे काढावीत
जिल्ह्यात तापमान वाढलेले आहे. पुढील तीन-चार दिवसांत पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे बागायतदारांनी परिपक्व आंबा फळांची काढणी करावी, असा सल्ला मुळदे संशोधन केंद्राने दिला आहे.