

दोडामार्ग : सासोली-हेदूस येथे उभ्या असलेल्या दुचाकी स्वाराला एका एसटी बसने चिरडल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी ६:३० वा.च्या सुमारास घडली. दिलीप तुकाराम हळणकर (५५, रा. कुडासे-वानोशी) यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी दुर्घटनेनंतर तब्बल तासाभरानंतर घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांनी उपस्थित जमावाला नियम सांगत खाकीचा धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त जमावाने त्यांना चांगलेच फैलावर घेतल्याने अखेर श्री. पाटील यांनी नरमाईची भूमिका घेतली.
सासोली-हेदूस येथे गोवा हद्दीतील इब्रामपूरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत दिलीप हळणकर हे आपल्या ताब्यातील दुचाकीसह उभे होते. याच दरम्यान पणजीहून धाराशिवकडे जाणारी एसटी बस वेगात येत असताना चालकाचे बस वरील नियंत्रण सुटले आणि बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, हळणकर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी गर्दी केली.यावेळी तेथील परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने बस चालकाने सुरक्षिततेच्या दृष्टीने बसमध्येच राहिले. अपघाताची माहिती दोडामार्ग पोलीस ठाण्याला देण्यात आली. काही वेळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती देऊनही हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील व त्यांचे सहकारी तब्बल तासाभरानंतर घटनास्थळी दाखल झाले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित करत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. पाटील यांनी घटनास्थळी दाखल होताच त्यांच्या सहकाऱ्यांना पंचनामा करण्याच्या सूचना देत उपस्थित ग्रामस्थांना नियम सांगू लागले. यावेळी त्यांनी खाकीचा धाक दाखवण्याचा देखील प्रयत्न केला. त्यांच्या या कृतीमुळे शांत असलेला जमाव आक्रमक झाला व श्री पाटील यांना चांगलेच धारेवर धरले. त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. दहा मिनिटाच्या अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्यातून तुम्हाला यायला एक तास लागतो व मृतदेहाची त्यामुळे हेळसांड होते याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला. मात्र श्री. पाटील यांची धाकशाही सुरूच होती. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले. अखेर ग्रामस्थांचे रौद्ररूप पाहून श्री. पाटील यांनी नरमाईची भूमिका घेतली व त्यांनी हळूच तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी उपस्थित जमावाला शांत होण्याची विनंती केल्याने अखेर वातावरण निवळले.
अपघातानंतर बस रस्त्याच्या कडेला जाऊन शेजारील एका हॉटेलला धडकली. त्यामुळे हॉटेलच्या बांधकामाचे नुकसान झाले असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली. सुदैवाने हॉटेलमधील इतर कुणालाही दुखापत झाली नाही. पोलिसांनी पंचनामा सुरू केला असून रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू होती. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. दरम्यान, मृत दिलीप हळणकर हे भारतीय नौदल सेनेतून निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात आजारी पत्नी असून त्यांना आता सांभाळण्याची जबाबदारी घेणार कोण? हा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.