

मालवण : गेली 22 वर्षे भाजपात एकनिष्ठ राहून प्रतिकूल परिस्थितीत संघटना वाढवणारे भाजपचे मालवण मंडल अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी बुधवारी आपल्या पदाचा आणि पक्षाच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला. जिल्हा नेतृत्वाच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि अकार्यक्षमतेमुळे मालवण नगरपालिकेत भाजपचा पराभव झाला असून निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून समांतर यंत्रणा राबवली जात असल्याचा असा गंभीर आरोप मोंडकर यांनी केला.
बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत बाबा मोंडकर यांनी आपली व्यथा मांडली. ते म्हणाले, भाजप नेते विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी युवा दशेत पक्षाशी जोडलो गेलो. नारायण राणे आणि महायुतीचे नीलेश राणे यांच्या विजयासाठी आम्ही रक्ताचे पाणी केले. लोकसभा आणि विधानसभेला मालवण शहरातून आणि देवबाग जिल्हा परिषद गटातून विक्रमी मताधिक्य पक्षाच्या उमेदवारांना मिळवून दिले. मात्र, नगरपरिषद निवडणुकीवेळी जिल्हा नेतृत्वाकडून कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम झाले.
अनेक वर्षे नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष म्हणून काम केलेल्या व पक्षाशी एकनिष्ठ कार्यकर्त्यांना तिकीट वाटपात डावलून तिसर्याच पॅरलल यंत्रणेला झुकते माप देण्यात आले. मित्रपक्षासोबत (शिवसेना-शिंदे गट) युती करण्याबाबत जिल्हा नेतृत्वाने संभ्रम निर्माण केला. सुरुवातीला युती नाकारली आणि नंतर कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता स्वतंत्र लढण्याची रणनीती आखली, जी भाजपच्या पराभवास कारणीभूत ठरली. संघटनेत प्रश्न विचारणार्या कार्यकर्त्यांना ‘पटत नसेल तर राजीनामा द्या’ अशी उत्तरे जिल्हा स्तरावरून दिली गेली. कार्यकर्त्यांचा केवळ निवडणुकीपुरता वापर करून घेण्याची पद्धत आता सहन होत नाही. राज्यामध्ये भाजप क्रमांक एकवर असताना मालवणमध्ये मात्र जिल्हा नेतृत्वाच्या चुकीच्या कॅलक्युलेशनमुळे पिछेहाट होत आहे असे मोंडकर म्हणाले.
बाहेर पडणे आनंदाची गोष्ट नाही
ज्या परिवारासाठी 22 वर्षे कष्ट घेतले तिथून बाहेर पडणे आनंदाची गोष्ट नाही, तर अत्यंत दुःखाची आहे. पण भविष्यात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये पुन्हा कार्यकर्त्यांचा असाच वापर होऊ नये आणि त्यांना त्रास होऊ नये, यासाठी मी बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे, असे मोंडकर यांनी स्पष्ट केले.