

फुलेवाडी : करणी काढून देतो, लग्न जमवून देतो, अंगातील भूत काढतो, तसेच अपत्यप्राप्ती करून देतो, अशा बहाण्याने भूलभुलय्या करून अनेक महिलांना फसवणारा सनी भोसले ऊर्फ ‘चुटकीबाबा’ याची रिंगरोड परिसरातील विशालनगर येथे करवीर पोलिसांनी मंगळवारी दुपारी धिंड काढली.
दोन वर्षांपासून ‘चुटकीबाबा’चे विशालनगर परिसरात भोंदूगिरीचे दुकान चालू होते. मी बह्मांडाचा नायक आहे, असे म्हणत त्याने अनेक महिलांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. करवीर पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याचे अनेक कारनामे उघड होत आहेत. आपल्या भोंदूगिरीची आपण राहत असलेल्या परिसरात चर्चा होऊ नये, यासाठी श्री कालभैरवाचे मंत्र लाऊड स्पीकरवर मोठ्या आवाजात लावून तो नागरिकांची दिशाभूल करीत होता. महाशिवरात्री दिवशी त्याने महादेवाची पूजा करून महाप्रसादाचे वाटपदेखील केले होते.
सध्या भोंदू ‘चुटकीबाबा’ ज्या घरात राहत होता त्या घरात पूर्वी अनेक तृतीयपंथी राहत होते. त्यामुळे नागरिक त्या घराकडे दुर्लक्ष करत होते. त्याचाच फायदा कथित ‘चुटकीबाबा’ने घेऊन अनेकांना आर्थिक गंडा घातला आहे. करवीर पोलिसांनी त्याच्या घरातील अनेक वस्तू जप्त केल्या आहेत. मंगळवारी दुपारी त्याची परिसरातून वरात काढण्यात आली. यावेळी परिसरातील महिलांनी व नागरिकांनी गर्दी केली होती. करवीरचे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक विनायक सपाटे यांनी प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर भोंदू ‘चुटकीबाबा’ची चांगलीच बोबडी वळली होती.