Sindhudurg News : ओरोसमधील मूर्तीवरील शिलालेखाचे दुर्मीळ उदाहरण

क्षेत्रपाल मंदिरातील महिषासुरमर्दिनीच्या मूर्तीवर 142 वर्षांपूर्वीचा शिलालेख; मूर्तीशास्त्राचे अभ्यासक सतीश लळीत यांची माहिती
Sindhudurg News
ओरोसमधील मूर्तीवरील शिलालेखाचे दुर्मीळ उदाहरण
Published on
Updated on

ओरोस : शिलालेख हे इतिहासाच्या अभ्यासाचे एक मुख्य साधन आहे. मात्र देवतेच्या मूर्तीवर सहसा शिलालेख आढळत नाही. असे असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस बुद्रुक येथील सातेरी मंदिर परिसरातील क्षेत्रपाल मंदिरात असलेल्या महिषासुरमर्दिनीच्या मूर्तीवर दिनांक आणि नाममुद्रा असलेला 142 वर्षांपूर्वीचा शिलालेख आढळून आला आहे. ही बाब अतिशय दुर्मीळ आहे, अशी माहिती पुरातत्व आणि मूर्तीशास्त्राचे अभ्यासक सतीश लळीत यांनी दिली आहे.

श्री. लळीत म्हणाले, ओरोस बुद्रुक गावातील जि.प. शाळा क्र. 1 च्या जवळ सातेरी देवी मंदिर आहे. जवळच अन्य दोन छोटी मंदिरे आहेत. यापैकी श्री देव क्षेत्रपाल या मंदिरात क्षेत्रपाल व वंश देवतांच्या जोडीनेच महिषासूरमर्दिनीची सुमारे दोन फूट उंचीची काळ्या पाषाणातील सुबक मूर्ती आहे. या मूर्तीवर देवीच्या मागच्या डाव्या हातामागे स्पष्ट कोरलेला एक शिलालेख आढळून आला आहे. ता. 29 मे स. 1884 रामजी कुमया च्यारी असा हा लेख आहे. यात 29 मे 1884 हा काळाचा स्पष्ट उल्लेख इंग्रजी सनानुसार असून रामजी कुमया च्यारी हे व्यक्तीनाम कोरलेले आहे. कदाचित या तारखेला या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली असावी व रामजी कुमया च्यारी नावाच्या दानशूर भाविक व्यक्तीने ही मूर्ती दान केली असावी, असा अर्थ यातून निघू शकतो. मूर्ती मंदिरात असल्याने ती आणि शिलालेख अत्यंत सुरक्षित असून कोणतीही झीज झालेली नाही, असे दिसून येते.

क्षेत्रपाल देवता ही ग्रामीण भागात सर्रास आढळणारी देवता आहे. ही देवता जमीन, शेत किंवा विशिष्ट भौगोलिक प्रदेशाची रक्षक देवता मानली जाते. गावाच्या किंवा जमिनीच्या सीमांचे दुष्ट शक्तींपासून संरक्षण करणे हे त्यांचे कार्य आहे. सामान्यतः हे शिवाचे स्वरूप (भैरव) मानले जाते. शेतजमीन किंवा वास्तूच्या रक्षणार्थ क्षेत्रपाल देवतेला पूजले जाते. क्षेत्र (जमीन/जागा) अधिक पाल (रक्षक) जमिनीचे रक्षण करणारा असा त्याचा अर्थ अ ाहे. क्षेत्रपाल अनेकदा भैरव, म्हसोबा किंवा स्थानिक ग्रामदेवतेच्या रुपातही आढळतो.

शेती पेरणीपूर्वी, गृहप्रवेशावेळी किंवा नवीन जमीन घेताना क्षेत्रपालाची पूजा करण्याची प्रथा आहे. क्षेत्रपाल हे ग्रामदेवता आणि कुलदेवता यांच्याशी संबंधित असून, त्यांना जमिनीचे रक्षक दैवत मानले जाते. अशा या क्षेत्रपाल मंदिरात महिषासूरमर्दिनीची ही मूर्ती स्थापित करण्यात आली आहे, हे विशेष आहे, अशी माहिती लळीत यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news