Nilesh Rane : एनजीटीचा निर्णय मालवणच्या किनारपट्टीसाठी दिलासादायक

पारंपरिक मच्छीमारांना धक्का नाही : आ. नीलेश राणे
Nilesh Rane
Nilesh Rane
Published on: 
Updated on: 

मालवण : राष्ट्रीय हरित लवादच्या पुणे खंडपीठाने १७ नोव्हेंबर २०२६ रोजी दिलेला निर्णय हा मालवणच्या किनारपट्टीवरील पारंपरिक रहिवासी, मच्छीमार समाज आणि स्थानिक व्यावसायिकांच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक व दिलासादायक आहे. या आदेशात कोणालाही दोषी ठरवलेले नाही, कोणताही दंड आकारलेला नाही किंवा कोणत्याही बांधकामावर थेट कारवाईचे आदेश दिलेले नाहीत, असे आ. नीलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

येथील ‘नीलरत्न’ बंगल्यावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, बाबा परब, विकी तोरसकर, जॉन नरोन्हा, मंदार लुडबे आदी उपस्थित होते. या प्रकरणाची पार्श्वभूमी स्पष्ट करताना आ.राणे म्हणाले, याचिकाकर्ते श्री. हुले यांनी २०१९ पासून २०२५ पर्यंत किनारपट्टीच्या सर्वेक्षणाबाबत व विविध आक्षेपांवर सातत्याने तक्रारी आणि याचिका दाखल केल्या. सन २०१९, २०२३, २०२४ आणि २०२५ मध्ये विविध नोटिसा व तक्रारी झाल्या. यामध्ये मालवण नगरपरिषद, मेरीटाईम बोर्ड, भूमी अभिलेख, तलाठी आणि एमसीझेडएमए यांसह प्रशासनाच्या ८ ते १० विभागांनी सर्वेक्षण करून लवादासमोर सादरीकरण केले. ७ मार्च २०२४ हा सर्वेक्षणाचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

पुणे खंडपीठाच्या आदेशाबाबत बोलताना ते म्हणाले, या आदेशात प्रशासन, स्थानिक किंवा कोणतीही संस्था जबाबदार असल्याचे नमूद नाही. उलट याचिकाकर्त्याची याचिका फेटाळण्यात आली असून, पुढील सहा महिन्यांत प्रशासनाने व मालवण नगरपरिषदेने सर्वेक्षण पूर्ण करून अनधिकृत बाबी आढळल्यास त्याचा तपशील सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. थेट कारवाईचा कोणताही आदेश नाही. किनारपट्टीवर पारंपरिक पद्धतीने राहणारे नागरिक व मच्छीमार बांधवांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आम्ही सर्वजण एकत्रितपणे उभे आहोत. पारंपरिक व्यवसाय किंवा निवासाच्या बाबतीत प्रशासनाने कोणतीही गडबड केल्यास तीव्र उद्रेक होईल आणि आम्ही मच्छीमार समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असा इशारा जिल्हा प्रशासन, नगरपरिषद आणि एमसीझेडएमए अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यावरणाचे रक्षण राखत किनारपट्टीवरील घटकांना संरक्षण देणे हाच मुख्य उद्देश आहे. ज्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे व पुरावे आहेत, त्यांना घाबरण्याचे कारण नाही. येत्या तीन-चार महिन्यांत सर्वेक्षणातील बाबींवर प्रशासनासोबत चर्चा करून सहा महिन्यांनंतर सकारात्मक सादरीकरण केले जाईल. या कामात पालकमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार, नगरपरिषद आणि विकी तोरसकर यांच्यासह सर्व सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

आ. राणे म्हणाले, मला कोणत्याही श्रेयवादात जायचे नाही; तर किनारपट्टीचा हा गंभीर प्रश्न कायमस्वरूपी सुटणे महत्त्वाचे आहे. सोशल मीडियाच्या काळात कोण काय काम करते हे सर्वांनाच दिसते. प्रशासनाने आता कोर्टावर जबाबदारी न ढकलता किनारपट्टीचे रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडावी, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.