कणकवली, अजित सावंत:
सर्वसामान्य रुग्णांसाठी आधारवड म्हणून पाहिली जाणारी सरकारी आरोग्य यंत्रणा सक्षम करणे हा खरे तर राज्यकर्त्यांचा प्राधान्यक्रम असायला हवा, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी आरोग्य यंत्रणा दुर्लक्षीत राहिल्याचे वास्तव आहे. सिंधुदुर्गात तीन वर्षांपूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाल्याने सर्वसामान्य रुग्णांची ही उपेक्षा थांबेल असे वाटले होते, मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यात होऊनही वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अपुऱ्या मनुष्यबळामुळे रुग्णांची ससेहोलपट आजही सुरुच आहे.
अपघातातील गंभीर रुग्ण असोत की हृदयविकारासह इतर आजारांवरील रुग्ण, त्यांना उपचारांसाठी गोवा-बांबोळी किंवा जिल्ह्याबाहेर जाण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ही सर्वसामान्यांच्या जिवीताशी निगडित आरोग्य यंत्रणेची ही विदारकता कधी संपणार असा सवाल सर्वसामान्यांकडून केला जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होऊन तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. २७ जून २०२३ रोजी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग हे कायमस्वरूपी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्गकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.
मात्र वस्तुस्थिती पाहता तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि अपुऱ्या कर्मचाऱ्यां अभावी ज्याक्षमतेने रुग्णालयाचा कारभार चालायला हवा तो चालताना दिसत नाही. त्याचा परिणाम जिल्ह्यातील रुग्णसेवेवर होत आहे. या रुग्णालयात तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांची ५६४ पदे मंजूर असून त्यापैकी केवळ ४७ पदे भरण्यात आली आहेत तर ५१७ पदे रिक्त आहेत. वर्ग ३ व ४ ची बाह्यस्त्रोतांनी रिक्त आहेत. त्याशिवाय बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयांच्या सेवांची सर्व पदे रिक्त आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विचार करता प्राध्यापकांच्या २२ मंजूर पदांपैकी १७ पदे रिक्त आहेत. सहयोगी प्राध्यापकांच्या २७ पदांपैकी १६ पदे रिक्त आहेत. सहाय्यक प्राध्यापकांच्या ४३ मंजूर पदांपैकी ३१ पदे रिक्त आहेत. शिवाय अध्यापकांची ४६ पैकी २२ पदे रिक्त आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मंजूर ९२ अतांत्रिक पदांपैकी ८३ पदे रिक्त आहेत. तर तांत्रिक ९१ पदांपैकी ८७ पदे रिक्त आहेत. या अपुऱ्या मनुष्यबळामुळे वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार चालवायचा तरी कसा, हा यंत्रणेसमोर प्रश्न आहे.
गोरगरिब, सर्वसामान्य रुग्णांना खाजगी रुग्णालयांचे महागडे उपचार आणि इतर आवश्यक यंत्रणांचा अभाव असल्याने परवडत नाहीत, त्यांना सरकारी रुग्णालय हाच एकमेव आधार असतो. मात्र त्याच सरकारी रुग्णालयांची अवस्था सद्यस्थितीत केविलवाणी आहे. वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात अतिदक्षता विभाग चालू आहे परंतू पुरेसे मनुष्यबळ नसल्याने ते पूर्ण क्षमतेने चालू नाही. या रुग्णालयातील सीआर्म मशिन बंद असल्याने अपघातातील फॅक्चर रुग्णांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात पाठवावे लागते. अपघातातील गंभीर रुग्णांवर खरे तर 'गोल्डन अवर'मध्ये उपचार होणे आवश्यक असते.
मात्र डोक्यातील रक्तस्त्राव अन्य बाबींसाठी सपर स्पेशालिटी डॉक्टर नसल्याने रुग्णांना गोवा-बांबोळी किंवा कोल्हापूर, मुंबईत पाठवण्याचा सल्ला दिला जातो. सरकारी रुग्णालयात हृदयरोग, मेंदूशी निगडित आजार, मुत्रविकार आदी गंभीर रोगांवर उपचार होणे आवश्यक आहे मात्र तेच तज्ज्ञ रुग्णालयात नसल्याने प्राथ. उपचार करून त्यांना अन्यत्र पाठविले जाते. जिल्हा रुग्णालयाबरोबरच ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांमधील स्थितीही फारशी वेगळी नाही. इथल्या रुग्णांना सातत्याने जिल्ह्याबाहेर जावे लागत असल्याने त्याचा भार १०८ रुग्णवाहिकांवर आहे. त्या तरी किमान अद्ययावत हव्यात. खासगी रुग्णालयांचे महागडे उपचार सर्वसामान्यांना परवडत नाहीत. त्यासाठी सरकारी आरोग्य यंत्रणा सक्षम व्हायला हवी.