

कुडाळ : जिल्हा परिषदेमार्फत जी विकासकामे झाली नाहीत, त्या कामांची बिले करण्यात आली आहेत. आणि अधिकाऱ्यांना धमकावून तसेच जे अधिकारी धमकावूनही सही करण्यास तयार नाहीत, अशा अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून कोट्यावधी रुपयांची बिले काढण्यात आली आहेत. या प्रकरणी जि.प.च्या अध्यक्षांनीही चांगली भूमिका घेतली आहे; परंतु यापुढील काळात त्यांच्यावरही दबाव येईल. परंतु या खोट्या सह्या करून झालेल्या चुकीच्या कार्यपद्धती विरोधात आम्ही आंदोलन करून आवाज उठवणार आहोत. सोमवारी जिल्हा परिषद प्रशासनाची भेट घेऊन, आवाज उठवला जाणार असल्याचे यावेळी वैभव नाईक म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासनाचा कोणत्याही गोष्टींवर वचक राहिलेला दिसत नाही. त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांचाही प्रशासनावर मोठ्या प्रमाणात दबाव असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आ.तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी करून जिल्ह्यातील प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. झाराप रेल्वे स्टेशनवरील खनिजसदृश्य मातीच्या अवैध वाहतुकीपासून ते जि. प. बांधकाम विभागातील बिलांवरील कथित खोट्या सह्यांच्या विविध मुद्द्यांवर त्यांनी सत्ताधारी आणि प्रशासनावर टीका केली.
कुडाळ येथे शनिवारी आलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी वैभव नाईक म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासनाचा कोणत्याही गोष्टींवर वचक राहिलेला दिसत नाही. त्याचबरोबर प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव मोठ्या प्रमाणात असून, वारंवार अधिकाऱ्यांनीही खासगीत बोलताना बोलून दाखवले आहे.
झाराप रेल्वे स्टेशनवरुन खजिन सदृश्य मातीची मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाहतूक केली जात आहे. जेथे मंजूरी आहे तेथे मायनिंग न पाठवता, ज्या ठिकाणी मंजूरी नाही अशा दुसऱ्याच ठिकाणी पाठवले जात आहे. कोट्यावधी रूपये किंमतीच्या खनिज सदृश्य मातीची खुलेआम लुट होत आहे. याला प्रशासन आणि प्रशासनावर दबाव ठेवणारे राज्यकर्ते जबाबदार असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला.