

सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात औद्योगिक क्रांती व्हावी, त्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा व जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढावे, हे स्वप्न काही वर्षांपूर्वी खा. नारायण राणे यांनी पाहिले. ते स्वप्न प्रत्यक्ष साकार करण्याचे काम पालकमंत्री म्हणून मी सुरू केले आहे. त्याचीच मुहूर्तमेढ आज रोवली जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देणाऱ्या आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्या ‘झोया मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’च्या भव्य जहाज बांधणी प्रकल्पाच्या माध्यमातून २०० बोटी बनवण्याचे काम तळवणे गावात होणार असून स्थानिक २०० युवक-युवतींना याच भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील. ‘रिव्हर्स माइग्रेशन’ची ही सुरुवात असून आरोंदा जेटी व रेडी बंदर तसेच ताज पंचतारांकित प्रकल्प देखील लवकरच मार्गी लागतील. आता विरोधाला थारा न देता आपण विकासाची सवय लावून घेत आशावादी होऊन विकासाला साथ देऊया, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
सावंतवाडी तालुक्यातील तळवणे गावात ‘झोया मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’च्या जहाज बांधणी प्रकल्पाचे भूमिपूजन मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याला महाराष्ट्राच्या नकाशावर आणण्याचे काम नारायण राणेंनी केले. त्यामुळे या प्रकल्पाच्या भूमिपूजनाला शुभारंभाला त्यांना इथे घेऊन यायचं आहे, असे त्यांनी सांगितले.
ना. राणे म्हणाले, या जिल्ह्याबद्दल काहीही माहिती नसताना काहीजण जमीन व्यवहारावरून जिल्ह्याची प्रतिमा खराब करण्याचे काम करत आहेत. त्यांना उत्तर देत न बसता कामातून उत्तर देण्याचा निश्चय मी केला आहे. खा. नारायण राणे यांनी अनेक प्रकल्प जिल्ह्यात आणले. त्यातील सिंधुदुर्ग विमानतळ, मुंबई-गोवा महामार्ग यासारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास गेले तर सी वर्ल्ड व अन्य प्रकल्प विरोधासाठी विरोध झाल्याने अपूर्ण राहिले. त्यामुळे जेव्हा मी पालकमंत्री झालो तेव्हा येथील लोकांसाठी जिल्ह्यातच रोजगार निर्माण करण्याचा निर्धार करण्याचा शब्द त्यांनी दिला असून महाराष्ट्र सरकारकडून त्यांना संपूर्ण सहकार्य दिले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आरोंदा जेटीचे लवकरच उद्घाटन होणार असून त्यामुळे पर्यटन, जलवाहतुकीची दालने खुली होणार आहेत. खा. नारायण राणे यांनी काही वर्षांपूर्वी सुरू केलेले व सद्यस्थितीत बंद असलेले रेडी बंदर सुरू करण्यासाठी मी पुढाकार घेतला असून १०० टक्के क्षमतेवर ते सुरू करण्याचा विश्वास यानिमित्ताने देतो. तसेच देवगड बंदर लवकरच सुरू होणार असून जिल्ह्यातील दोन टोकावरील या बंदरांमुळे गुजरातप्रमाणे इथलाही विकास होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रकल्पासाठी सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या झोया मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे सरकारकडून त्यांना संपूर्ण सहकार्य दिले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनिष दळवी, माजी आ. राजन तेली यांनीही मनोगत व्यक्त केली. माजी सभापती संदीप नेमळेकर यांनी सावंतवाडी तालुक्यातील तळवणे गावात प्रकल्प आणल्याबद्दल ऋण व्यक्त केले. युवराज लखमराजे भोंसले, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, जि. प. सदस्या अपर्णा सातोसकर, माजी सदस्या शर्वाणी गावकर, माजी उपसभापती संदीप नेमळेकर, पं. स. सदस्या स्नेहा कांबळे, तळवणे सरपंच गोविंद केरकर, उबाठा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, शेखर गावकर, सिद्धेश कांबळी आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी, तळवणे ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक कंपनीचे संचालक जॉन फर्नांडिस यांनी तर सूत्रसंचालन नीलेश पवार यांनी केले. आभार मेरिटाईम बोर्डचे अधीक्षक अभियंता देवरे नीलेश बाणावलीकर यांनी विशेष आभार मानले.
या प्रकल्पाच्या माध्यमातून सुरुवातीला २०० बोटी बनविण्याचे काम इथे होणार आहे. विशेष म्हणजे मुंबईतील ‘वॉटर मेट्रो’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी बोटी बनवण्याचे काम या कारखान्यात होणार आहे. कारखाना उभारणीनंतर दीड ते दोन महिन्यात पहिली बोट तयार होणार असून २०० स्थानिक तरुण-तरुणींना रोजगार मिळणार आहे. कुशल कामगारांबरोबरच कुशल कारागीर बनविण्यासाठी येथील युवकांसाठी ट्रेनिंग सेंटर उभारले जाणार आहे. त्यामुळे युवापिढीने भूलथापांना बळी पडू नये न पडता या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्याला कसा रोजगार मिळेल व त्यासाठी काय करायला हवं त्याचा अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले.
पर्यावरणपूरक प्रकल्प हवे म्हणून आंदोलन करणारे लोक आज कुठे दिसत नाहीत. अशा प्रकल्पांचे स्वागत करत सरकारला साथ का देत नाहीत? असा सवाल करत लोकांनी आता अशा लोकांचे चेहरे ओळखणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.