

कुडाळ : हुमरमळा वालावल गाळवणवाडी परिसरात रविवारी (दि. ९ ऑगस्ट २०२६) एका १५ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी निवती पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेची खबर शंकर रामा कानडे (वय ३९, रा. गाळवणवाडी हुमरमाळा, वालावल) यांनी निवती पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कु. युगा उमेश कानडे (वय १५, रा. गाळवणवाडी हुमरमाळा, वालावल, ता. कुडाळ) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती नववी इयत्तेत पाट हायस्कूल येथे शिक्षण घेत होती.
पोलीसात दिलेल्या फिर्यादीनुसार युगा ही गेल्या चार ते पाच दिवसांपासून शांत-शांत राहत होती व कोणाशीही बोलत नव्हती. रविवारी दुपारी सुमारे १.१५ वाजण्याच्या सुमारास तिने राहत्या घरातील बाथरूमच्या गॅलरीतील बाराला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. या प्रकरणी निवती पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी भारतीय न्याय संहिता कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे हुमरमळा वालावल परिसरात हळहळ व्यक्त होत असून एका अल्पवयीन विद्यार्थिनीच्या अकाली निधनाने ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.