

कुडाळ :सिध्दिविनायक बिडवलकर खून प्रकरणात मोक्का लावू नये म्हणून 10 लाखांची खंडणी मागितल्याची गंभीर तक्रार सिद्धेश शिरसाठ यांच्या पत्नी सिद्धिका शिरसाठ यांनी केली असून, याप्रकरणी ॲड. किशोर वरक आणि त्यांचे सहकारी सुरेश झोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.
जुलै 2025 मध्ये बिडवलकर खून प्रकरणाची सुनावणी होणार असून, या प्रकरणात ॲड. किशोर वरक हे सरकारी वकिलांसोबत न्यायालयीन कामकाजात सहभागी होणार होते.तक्रारानुसार सिद्धेश शिरसाट यांच्यावर मोक्का लावू नये असं वाटत असेल तर 10 लाख रुपये द्यावे लागतील, असा संदेश ॲड. किशोर वरक यांचे व्यक्ती सुरेश झोरे (रा. हिर्लोक) यांनी सिद्धिका शिरसाट यांना दिला.
त्यानंतर सिद्धिकाने १ लाख रुपये ॲडव्हान्स दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ॲडव्हान्स म्हणून ५ लाखांची मागणी झाली होती, तर त्यांनी २ लाख ५० हजार रुपये देण्याचे कबूल केले होते. मात्र, नंतर सिद्धेश शिरसाट यांना जामीन मिळाल्याने उर्वरित रक्कम न देताच त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार खंडणी मागण्याच्या आरोपाखाली ऍड. किशोर वरक व सुरेश झोरे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला गेला आहे, असे पोलीस निरीक्षक मगदूम यांनी सांगितले.