

Criminal banishment Sindhudurg
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पिंगुळीतील सराईत गुन्हेगार नदीम अब्दुल रहमान शेख याला दोन वर्षासाठी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबतचा आदेश कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी पारित केला आहे.
नदीम अब्दुल रेहमान शेख यांच्यावर चोरी, घरफोडी, दुखापत, खुनाचा प्रयत्न यासारखे ८ गंभीर गुन्हे दाखल असून त्याला २७ एप्रिल रोजी कोल्हापूर जिल्ह्यात पाठविण्यात आले आहे, अशी माहिती कुडाळ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली आहे.
नागरिकांचे जीविताचे व मालमत्तेचे रक्षण करणे हे पोलिसांचे आद्य कर्तव्य आहे. काही समाजकंटक सराईत गुन्हेगार यांच्या पासून नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण व्हावे यासाठी त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल, अपर पोलीस अधीक्षक अषिकेश रावले यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रमुख यांना आदेशित केले होते. यानुसार कुडाळ पोलिसांच्या हद्दीत राहणारा सराईत गुन्हेगार नदीम अब्दुल रहमान शेख रा. पिंगुळी याच्या वर चोरी, घरफोडी, दुखापत, खुनाचा प्रयत्न यासारखे ८ गंभीर गुन्हे दाखल होते.
त्याच्या वागण्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नव्हती. या सराईत गुन्हेगारापासून भविष्यात गंभीर गुन्हे घडू नये यासाठी त्याला पायबंद घालणे जरुरीचे होते. यासाठी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी या व्यक्तीला महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे दोन वर्षासाठी सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी, कुडाळ ऐश्वर्या काळुसे यांच्याकडे पाठवला होता.
पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पाठवलेल्या हद्दपार प्रस्तावाची सुनावणी उपविभागीय दंडाधिकारी, कुडाळ यांच्याकडे होऊन त्यांनी सराईत गुन्हेगाराला सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्याबाबतचा आदेश पारित केला आहे.त्याप्रमाणे या आदेशाची अंमलबजावणी करून या गुन्हेगाराला रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करुन त्याला कोल्हापुर जिल्ह्यात आज दि. २७.एप्रिल २०२५ रोजी पाठविण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग सौरभ कुमार अगरवाल, अपर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग ऋपिकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुडाळ राजेंद्र मगदूम, पोलिस अंमलदार कृष्णा केसरकर, प्रीतम कदम, कृष्णा परुळेकर, संजय कदम, रुपेश सारंग, यांनी केली आहे.
कुडाळ पोलीस ठाणे अभिलेखावर ज्या व्यक्तींवर गुन्हे दाखल आहेत व त्यांच्या वागण्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नाही अशा गुन्हेगारांच्या अभिलेखाची पडताळणी करून त्या व्यक्तींवर अशाप्रकारे कारवाई करण्यात यापुढेही सातत्य ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती कुडाळ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली आहे.