

सावंतवाडी : सावंतवाडी -माठेवाडा येथील विवाहिता जीवन संपवले प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या व रुग्णालयात उपचार घेत असलेला तिसरा संशयित मिलिंद आनंदराव माने याला जिल्हा सत्र न्यायालयालनेाही, यामुळे त्याच्याकडून अधिक माहिती मिळवता आलेली नाही. मात्र पोलिसांनी मिलींद मानेच्या मोबाईलचे सीडीआर मिळवला असून त्यानेही प्रिया चव्हाण हिला अनेक वेळा फोन केल्याचे कॉल रेकॉर्ड वरून समोर आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
माठेवाडा येथील नवविवाहिता प्रिया चव्हाण हिच्या आत्महत्ये प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी जलदगतीने तपास करून आत्तापर्यंत तिघां जणांवर शारीरिक व मानसिक छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. यात देवगडच्या माजी नगराध्यक्ष प्रणाली माने, मुलगा आर्य माने व पती मिलिंद माने यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याला या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी तिसरा संशयित म्हणून सहआरोपी केले आहे. संशयित मिलिंद माने याचा या गुन्ह्यात थेट सहभाग असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी विवाहितेच्या घरच्यांनी अगोदर पासून केली होती, त्यानंतर सर्व बाजूंनी तपास करून पोलिसांनी अखेरीस मिलिंद माने वर गुन्हा दाखल केला.
माने हा विवाहितेचा नातेवाईक असून त्याने मयत विवाहितेला मेडिकल शिक्षणासाठी चार लाख रुपये उसने दिले होते. ते त्यांना चव्हाण कुटुंबियांकडून परत दिले जाणार होते, मात्र या व्यवहारातून झालेल्या गैरसमजातून वाद उद्भवला. सौ. प्रिया हिने आत्महत्या करण्याच्या आदल्या रात्री संशयित प्रणाली माने व मुलगा आर्य माने याने प्रियाच्या सावंतवाडी येथे घरी जात आपल्या पती समोरच तिच्याशी वाद घातला. यामध्ये तिने अर्वाच्च भाषा वापरून प्रिया चव्हाण हिचा अपमान केला तसेच तिला धक्का ही दिला. ही सर्व घटना तेथील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. आमच्याकडून घेतलेले पैसै दे अन्यथा तुला बघून घेऊ, अशी धमकी देखील प्रणाली माने हिने सौ. प्रिया हिला दिली.
या सर्व वादावादीमुळे मानसिक ताण घेऊन प्रिया चव्हाण हिने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेचे फुटेज पोलिसांनी मिळवले आहेत. यातील संशयित मिलिंद माने यानेही प्रियाने आत्महत्या करण्यापूर्वी तिला फोन केले होते. यावर प्रिया ही आपली नातेवाईक म्हणून तिच्याशी मोबाईलवर बोलणे होत होते, अशी कबुली मिलींद माने याने पोलिसांना दिली आहे.
सावंतवाडी पोलिसांनी संशयित मिलिंद माने याला जबाबासाठी ताब्यात घेतले. परंतु त्याची तब्येत बरी नसल्यामुळे त्याला बुधवारी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यामुळे त्याच्याकडून अधिक माहिती पोलिसांना अद्याप मिळवता आली नाही. दरम्यान मिलिंद माने याला हिवताप झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याला शुक्रवार पर्यंत अंतरिम अटक पूर्व जामीन मिळाला आहे. शुक्रवार 11 जुलै रोजी प्रणाली माने, आर्य माने, मिलिंद माने या तिघांच्याही जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. यावेळी पोलीस देखील न्यायालयात आपले म्हणणे सादर करणार आहेत. माने याच्या मोबाईलचा सीडीआर पोलिसांनी प्राप्त केला आहे, त्यात त्याने विवाहितेला सातत्याने फोन केल्याचे कॉल डिटेल प्राप्त झाले आहेत, अशी माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली. अधिक तपास महिला पोलीस अधिकारी माधुरी मुळीक करत आहेत.