

वेंगुर्ला : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) सिंधुदुर्गने वेंगुर्ला तालुक्यातील तुळस परिसरामध्ये दारू वाहतुकीवर शुक्रवारी सकाळी मोठी कारवाई केली. या कारवाईत गोवा बनावटीची दारू तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली रिक्षा असा एकूण 2 लाख 13 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सकाळी सुमारे 10.40 वाजता सावंतवाडी–तुळस–वेंगुर्ला मार्गावर ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या दारूमध्ये गोवा बनावटीच्या विविध ब्रँडची मद्यसाठा आढळून आला. एकूण दारूची किंमत ₹63,360 तर वाहतुकीसाठी वापरलेली रिक्षा अंदाजे ₹1.5 लाख किमतीची अशी मिळून सुमारे ₹2.13 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी संतोष मेघश्याम नाईक (रा. वेंगुर्ला) आणि मेलविन फर्नांडिस (रा. गोवा) यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील कलम 65(अ), 65(इ), 81, 83 तसेच भारतीय न्याय संहितेचे कलम 281 अंतर्गत वेंगुर्ला पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड आणि पोलीस हवालदार अमर कांडर यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार एम. आर. आल्मेडा करत आहेत.