

मालवण : मालवण-तारकर्ली गावचे सुपुत्र गोविंद उर्फ बंटी केरकर यांनी क्रिकेट क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर भरारी घेतली आहे. बेंगळुरू येथे आयोजित ‘ISCL’ या राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वासाठी त्यांची पंच म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे मालवणसह तारकर्ली गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
ही स्पर्धा २५ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत बेंगळुरू येथील आचार्य स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारतातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ३२ संघ सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय स्तरावरील या मोठ्या स्पर्धेत पंच म्हणून काम करण्याची संधी बंटी केरकर यांना मिळाली आहे.
सुरेश रैना आणि हरभजन सिंग ब्रँड अम्बेसेडर
या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि 'मिस्टर आयपीएल' म्हणून प्रसिद्ध सुरेश रैना तसेच भारताचे माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग हे या स्पर्धेचे ब्रँड अम्बेसेडर आहेत. तारकर्लीच्या मातीतून राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेत पंच म्हणून निवड होण्याचा मान मिळविलेल्या बंटी केरकर यांच्या या यशाबद्दल मालवण तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.