Sindhudurg News : कालावल खाडी तळाशील आंदोलन अखेर स्थगित

आ. नीलेश राणेंच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांचा निर्णय
Kalawal creek protest
कालावल खाडी तळाशील आंदोलन अखेर स्थगित
Published on
Updated on

आचरा : उदय बापर्डेकर

कालावल खाडी पत्रात तोंडवळी गावातील तळाशील समोर गेले काही दिवस सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उत्खननाविरोधात ग्रामस्‍थांनी आंदोलन पुकारले होते. याची दखल घेत आ. निलेश राणे यांनी तोंडवळी गावाला भेट देऊन तळाशील ग्रामस्थांशी संवाद साधत वाळू उपसा होऊ देणार नसल्याचे महत्त्वपूर्ण आश्वासन बुधवारी दुपारी दिले. त्‍यानंतर हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय तळाशील ग्रामस्थांनी, महिलांनी घेतला.

गेल्या काही दिवसांपासून तळाशील ग्रामस्थांनी सनदशीर मार्गाने आंदोलन छेडले होते मात्र प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने मंगळवारी आंदोलन अधिक तीव्र करत महिलांनी सायंकाळी थेट खाडीपात्रात उतरून शासनाविरोधात जोरदार घोषणा देत आक्रमक पवित्रा घेतला होता. यावेळी काही महिला अत्यवस्थ झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. त्‍याची दखल घेत आ. निलेश राणे यांनी भेट दिली. यावेळी आ. निलेश राणे यांच्या समवेत जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुसे, नायब तहसीलदार प्रिया हर्णे, उपजिल्हाप्रमुख महेश राणे, शिवसेना विभाग प्रमुख संतोष कोदे, जि. प. सदस्य वर्षां सांबारी, पं. स. सदस्य गणेश तोंडवळकर, जयहरी कोचरेकर, संजय केळूसकर, आबा कांदळकर, संजय तारी, रविकिरण तोरसकर, तोंडवळी सरपंच नेहा तोंडवळकर, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडीस, उपसरपंच संतोष मिराशी, मुजफ्फर मुजावर, जयप्रकाश परुळेकर, पंकज आचरेकर, डॉ. प्रमोद कोळंबकर, अनन्या पाटील, अभय भोसले, गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .

निलेश राणे तोंडवळी गावात दाखल होत ग्रामस्थांशी संवाद साधला. संवाद साधताना ते म्हणाले, कालावल खाडीमध्ये तळाशील समोरील शेलटी जेटी ते सर्जेकोट भागात वाळू उपसा होणार नाही. या भागात कोणतेही टेंडर नाही, टेंडर लागणार नाही याची मी हमी घेतो, तशा इथे उपस्थित असलेल्या प्रांताधिकारी यांना सूचना केलेल्या आहेत. या भागात मी जोपर्यंत असेपर्यंत वाळू उपसा होऊ देणार नाही. जिथे तुम्हाला वाळू उपसा नको आहे तिथे वाळू उपसा होऊ देणार नाही. ज्या वाळूच्या होड्या आढळून आल्या त्या संशयीतांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश मेरी टाईम बोर्डाला दिले आहेत. प्रशासन, पालकमंत्री, खासदार, आमदार ग्रामस्थांबरोबर आहेत आपण ग्रामस्थ आंदोलन करत आहात, आपण महिला ग्रामस्थांनी आंदोलन थांबवावे प्रशासन लोकप्रतिनिधींनी आम्ही सर्वांनी याची जबाबदारी घेतलेली आहे यावेळी माता भगिनींना सुरु असलेले आंदोलन थांबवण्याची विनंती त्यांनी केली. आ. निलेश राणे यांनी तोंडवळी-तळाशील मध्ये बुधवारी दुपारी दाखल होत ग्रामस्थांना वाळू उपसा होणार नाही असे आश्वस्त केले. ग्रामस्थांच्या मागण्या मान्य असल्याचे सांगत त्यावर योग्य ती कार्यवाही होणार असल्याची आ. निलेश राणे यांच्या हमीनंतर तळाशील मधील महिला ग्रामस्थांनी गेले काही दिवस सुरू केलेले आंदोलन थांबविण्याचा निर्णय अखेर घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news