

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा : कवठी अन्नशांतवाडी येथील संदिप उर्फ बाळा दामोदर करलकर याच्या खून प्रकरणातील तीन संशयितांपैकी कामगार श्यामसुंदर प्रभाकर वाडयेकर (रा. कवठी-बांदेकरवाडी) याला पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. शनिवारी कुडाळ येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. (Sindhudurg Murder Case)
संदिप करलकर याला संशयितांनी आपल्या वडिलांना शिवीगाळ का केलीस? या रागाच्या भरात घरी जाऊन जाब विचारला, यावेळी झालेल्या झटापटीत संदिप करलकर गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या प्रकरणातील अन्य दोन संशयित पोलिसांच्या रडारवर असून लवकरच त्यांना जेरबंद करु, असा विश्वास तपास पोलीस अधिकारी भीमसेन गायकवाड यांनी व्यक्त केला.
कुडाळ तालुक्यातील कवठी अन्नशांतवाडीत संशयित श्यामसुंदर प्रभाकर वाडयेकर हा मंगळवारी (दि.२६ फेब्रुवारी) सकाळी एका बागायतदारांच्या बागेत काम करत होता. यावेळी बाग मालक अण्णा सुद्धा त्याच्या समवेत होता. याचदरम्यान गावातीलच संदिप उर्फ बाळा दामोदर करलकर हा बागेतील काजू चोरत होता. म्हणून कामगार शामसुंदर वाडयेकर याने त्याला जाब विचारला. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन धक्काबुक्की झाली. हा वाद वाढताच अण्णा यांनी भांडण करु नका, त्याला काय ते काजू चोरुन घेऊन जाऊ देत असे श्यामसुंदरला सांगितले.
त्यानंतर हा वाद शांत झाला. काही अंतरावर संदीप पुढे गेला आणि पुन्हा हातात दगड घेऊन अण्णा व शामसुंदर वाडेकर यांच्यावर भिरकावला. व तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी दिली. हा प्रकार अण्णा व कामगार शामसुंदर यांनी घरी येऊन सांगितला. आपल्या वडिलांना संदिप याने शिवीगाळ केली, याचा राग मनात धरून रामचंद्र दत्ताराम करलकर, शैलेश दत्ताराम कलरकर हे आपला कामगार श्यामसुंदर याला सोबत घेत संदीप याच्या घरी गेले.
यावेळी संदिपने शामसुंदर याला तुला खायला पान आणतो, असे सांगून तो घरात गेला आणि त्याने चक्क लाकडी दांडा आणला. यावेळी संदीपची शामसुंदर, रामचंद्र व शैलेश या तिघांची झटापट झाली. या झटापटीत संदिप याच्या हातातील दांडा त्या तिघांनी काढून घेतला. यावेळी संदिप याने माझं चुकलं, यापुढे मी बागेत येणार नाही, असे सांगून त्यांची माफी मागितली. पण झटापटीत संदीप याच्या मानेवर गंभीर घाव बसल्यामुळे रक्त स्त्राव होऊन त्याचा घरीच मृत्यू झाला.
संदीप करलकरच्या खून प्रकरणात आरोपी समवेत अन्य कोणी होते का? मारहाणीच्या वेळचा दांडा, कपडे ताब्यात घेण्यासाठी संशयिताला ५ दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी अॅड. मिरजे यांनी पोलिसांच्या वतीने केली. तर आरोपीच्या वतीने सरकारी वकील अॅड. बिले यांनी बाजू मांडली. याबाबतचा अधिक तपास तपासणी अधिकारी निवती पोलीस ठाण्याचे भीमसेन गायकवाड करत आहेत.