

कणकवली : गेल्या आठवड्यात धूमशान घातलेल्या पावसाने दोन-तीन दिवस विश्रांती घेतल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला होता. परंतु, ऐन गणेशोत्सवाच्या प्रारंभी पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारी सकाळपासून दिवसभर अक्षरशः धो-धो पाऊस बरसला. त्यामुळे खरेदीसाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांसह गणेशभक्तांची चांगलीच तारांबळ उडाली.
यावर्षी दमदार सरासरीने पाऊस पडत आहे. श्रावणात काहीसा पावसाचा जोर कमी झाला होता, मात्र गेल्या आठवड्यात धो-धो पाऊस झाला. त्यानंतर पुन्हा दोन-तीन दिवस पावसाने उघडीप घेतली. त्यामुळे चाकरमान्यांसह सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला होता. खरेदीसाठी मोठ्या संख्येने गणेशभक्त बाहेर पडले होते. मात्र सोमवारपासून पुन्हा पावसाने सुरुवात केली.
मंगळवारी सकाळपासूनच धो- धो सरी बरसल्या. दिवसभर काहीशी उघडीप देत पावसाच्या सरीवर सरी सुरू होत्या. त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या आदल्यादिवशी खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांना कसरत करावी लागली. त्याचा परिणाम खरेदीवरही काही प्रमाणात झाला. दरम्यान, हवामान खात्याने 29 ऑगस्टपर्यंत पाऊस बरसण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.