

दर महिन्याला सरासरी 4500 रुग्ण बांबोळीला रेफर
जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय होऊनही फरक पडेना
डॉक्टर्स व तंत्रज्ञाअभावी अद्ययावत यंत्रणाही निरूपयोगी
गोव्यातील लोकप्रतिनिधीं उडवतात सिंधुदुर्गवासीयांची खिल्ली
नागेश पाटील
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शासकीय आरोग्य यंत्रणेत गेल्या अनेक वर्षांत कोणताही बदल झालेला नाही. आजही जिल्ह्यातील रुग्णांना आरोग्यासाठी गोवा राज्य शासनाच्या बांबोळी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. ही बाब जिल्हयाच्या द़ृष्टीने भूषणावह नक्कीच नाही. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम होणार तरी कधी? असा सवाल जनतेचा आहे. अगदी साध्या-साध्या आजारांसाठीही रुग्ण गोवा-बांबोळी मेडीकल कॉलेजमध्ये रेफर करण्याचे प्रकार वाढत असून, या बाबत सर्वपक्षीय लोप्रतिनिधींनी गाभीर्याने विचार व कृती करण्याची गरज आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीनंतर ही समस्या मार्गी लगेल, जिल्हावासीयांना जिल्ह्यातच आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा होती. मात्र वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन तीन वर्षे उलटली तरी या परिस्थितीत काडीमात्र फरक पडलेला नाही.
सिंधुदुर्ग जिल्हा निर्मितीपासूनच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कमकुवत आहे. जिल्ह्यात सिंधुदुर्गगनरी येथे जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय तर कणकवली, सावंतवाडी व शिरोडा येथे उपजिल्हा रुग्णालये आहेत. शिवाय कुडाळ येथे महिला व बाल रुग्णालय, अन्य तालुका मुख्यालयांच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालये तर जिल्हाभरातील पंचक्रोशींच्या ठिकाणी मिळून 37 प्राथमिक आरोग्य केंद्रे असा जिल्हाभरत शासकीय आरोग्य यंत्रणेचा पसारा आहे. यातील जिल्हा रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयांमधून अत्याधुनिक सीटी स्कॅन, डायलेसीस, सोनोग्राफी तसेच पॅथॉलॉजी लॅब आदी यंत्रणा आहेत. मात्र त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञ व डॉक्टर्स उपलब्ध नसल्याने ही यंत्रणा केवळ दिखावून ठरत आहे. यामुळे अपघात, हार्टअटॅक, स्नेक बाईट, गुतांगुतीची शस्त्रक्रिया सारख्या गंभीर आजाराच्या रुग्णांना उपचारासाठी बांबोळीला पाठवले जाते.
मेडिकल इमरर्जन्सीसाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर, कार्डियाक रुग्णवाहिका, फिजिशीयन, सर्जन, हृदयरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, न्यूरो सर्जन आदी क्षेत्रातील डॉक्टर्स अनेक शासकीय रूग्णालयांमधून उपलब्ध नाहीत. डायलेसिस विथ ट्रामा केअर युनिट असलेली आयसीयू म्हणजेच सुसज्ज ऑपरेशन थिएटरची सुविधा सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय व दोन्ही उपजिल्हा रुग्णालयांमध्ये कार्यरत आहे. मात्र आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर्स नसल्याने या सुविधांचा वापरच करता येत नाही, अशी परिस्थिती आहे.
काही दिवसांपूर्वी सर्पदंशाच्या रुग्णालाही बांबोळी रुग्णालयात पाठविण्यात आला होते. यावरून जिल्हयाच्या आरोग्य यंत्रणेचे गोवा मेडिकल कॉलेज प्रशासनाकडून वाभाडे काढण्यात आले होते. एकंदर परिस्थिती पहाता सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणाच गोवा राज्यावर अवलंबून आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हाच गोवा राज्याला जोडा, अशी उपरोधिक मागणी नागरिकांमधून होत आहे.
गोव्यातील रुग्णांच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णच गोव्याच्या आरोग्य सुविधांचा लाभ जास्त प्रमाणात घेतात, असा आरोप गोव्यातील मंत्र्यांनी वारंवार केला आहे. ही बाब येथील मंत्री, लोकप्रतिनीधी, राज्य शासन, डॉक्टर व जिल्हावासीयांच्या द़ृष्टीने शरमेची बाब आहे. मात्र जीव वाचवायचा असेल तर गोवावासीयांचे हे टोमण ऐकून घेतल्याशिवाय पर्याय नाही.
जिल्हाभरातून महिन्याला जवळपास4500 रुग्ण बांबोळी येथे उपचारासाठी दाखल होतात. यावरून सिंधुदुर्गातील रुग्णांसाठी गोव्याची वारी नित्याची बनली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारलेल्या शासकीय रुग्णालयांमध्ये जर योग्य उपचार होत नसतील तर ही रुग्णालये फक्त शवविच्छेदनासाठीच आहेत का? असा सवाल नागरिकांमधून केला जात आहे.रिक्त पदे, तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव हे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला लागलेले ग्रहण आहे. नुकताच झालेल्या अधिवेशनात आ. निलेश राणे यांनी जिल्ह्याच्या व्हेंटीलेटरवर असलेल्या आरोग्य यंत्रणेचे वाभाडे काढले होते.
सिंधुदुर्गातून दर महिन्याला असे शेकडा रुग्ण उपचाराकरीता गोव्यात पाठविले जाते. विशेष म्हणजे ही संख्या कमी होण्या ऐवजी ती वाढत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गोव्यात येणार्या रुग्णांचा हा ओघ पाहून गोवा-बांबोळी रुग्णालयातील कर्मचारी, डॉक्टर जिल्ह्यातील रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना ‘तुमचे मंत्री किदे करता!’ म्हणजेच तुमच्या जिल्ह्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी काय करतात? असा सवाल करतात. या प्रश्नाचा अनुभव जिल्ह्यातील रुग्णांना सातत्याने येत आहे.
सिंधुदुर्ग मेडीकल कॉलेज सुरू होऊन 2 वर्षे होत आली तरीही या मेडिकल कॉलेजसाठी लागणारी कर्मचारी पदे, तज्ज्ञ डॉक्टर, स्टाफ पूर्णपणे देण्यात आलेले नाही. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात 130 डॉक्टर व रिक्त पदे भरण्याची गरज सध्या आहे. 400 नर्स, 108 स्टाफ कर्मचारी या रुग्णालयाला पुरविणे आवश्यक आहे, मात्र मोजके कर्मचारी व काही डॉक्टरांच्या जीवावर सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज सुरू आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सोबत जिल्ह्यातील आमदारांची बैठक झाली. त्यात तातडीने जिल्ह्याच्या आरोग्य सेवा संदर्भात काही निर्णय घेण्यात आले. मात्र त्यांची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही, उलट जिल्हावायिीांची गोवा-बांबोळी वारी सुरू आहे. मागील 15 वर्षांपासून हे चित्र जैसे थे असून आरोग्य यंत्रणेत म्हणावा तसा बदल झालेला नाही, हे दुर्दैव आहे.