

काशिराम गायकवाड
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या घराघरांत श्री गणपती बाप्पांचे आगमन झाले असून, सर्वत्र उत्साह, आनंद आणि भक्तिभावाचं वातावरण आहे. कोकणातील परंपरांनुसार साजरा होणारा हा उत्सव आधुनिक तंत्रज्ञान सोशल मीडियावरही ठसा उमटवत आहे. जणू संपूर्ण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘बाप्पामय’ झाला आहे.
व्हॉटस्अॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर (एक्स) यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गणेशभक्त आपल्या घरी विराजमान बाप्पाचे फोटो, सजावटीचे व्हिडीओ, आरत्या आणि भजनांचे क्लिप्स उत्साहात शेअर करत आहेत. या पोस्टना भरभरून लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्स मिळत असून, ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष ऑनलाईन विश्वातही दुमदुमत आहे. प्रत्येकाच्या व्हॉट्सअॅप स्टेट्स, प्रोफाईलला गणपती बाप्पाचेच फोटो आणि व्हिडीओ दिसत असून, संपूर्ण सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म ‘बाप्पामय’ झाला आहे.
विशेष म्हणजे कोकणातील निसर्गरम्य पार्श्वभूमीतील पारंपरिक आरास, नारळाच्या पानांनी सजलेली मंडपं, हाताने तयार केलेल्या देखाव्यांची छायाचित्रे इतर भागातील गणेशभक्तांना खूपच आकर्षित करत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गातील गणेशोत्सव सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्याच्या आणि देशाच्या सीमा ओलांडून जगभर पोहोचत आहे.
आरत्या, भजनं, फुगड्या, ढोल-ताशा, पारंपरिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे या उत्सवात सांस्कृतिक रंग भरले गेले आहेत. अनेक कुटुंबांनी एकत्र येऊन आरत्या म्हणण्याची परंपरा आजही जिवंत ठेवली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीनेदेखील विविध कार्यक्रम आयोजित करून गणेशभक्तांना एकत्र येण्याची संधी दिली जाते आहे.
नवीन पिढी सोशल मीडियाचा वापर करून बाप्पाच्या उत्सवाला एक नवीन दिशा देत आहे. लाईव्ह आरत्या, यूट्यूब ब्लॉग्स, इन्स्टाग्राम रिल्स आणि फेसबुक लाईव्ह यामार्फत आपल्या घरी आलेल्या गणरायाचे दर्शन देशभरातील नातेवाईकांपर्यंत पोहोचवले जात आहे. या नव्या ट्रेंडमुळे परदेशात राहणारे कोकणवासीयही या उत्सवाशी भावनिकरीत्या जोडले गेले आहेत.