

मालवण : छत्रपती शिवाजी महाराज यांनी 350 वर्षांपूर्वी मालवण समुद्रात उभारणी केलेल्या ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश झाला. हा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा व मालवण तालुका प्रशासन तसेच किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने मालवण बंदर जेटी येथे शिवभक्तांच्या उपस्थितीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत स्वराज्य ढोल ताशां पथकाचा आसमंत दणाणणारा गजर व गुलाल उधळीत, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. घोषणानी परिसर दाणाणून गेला.
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत किल्ले सिंधुदुर्गचा समावेश झाल्याने मालवणात आनंदाचे वातावरण आहे. ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतिषबाजीत केलेल्या या आनंदोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज की जय... जय भवानी जय शिवाजी... धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय... हरहर महादेव... अशा घोषणा देण्यात आल्या. भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. यानंतर शिवप्रार्थना झाली.
निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार वर्षा झाल्टे, पोलीस निरीक्षक मारुती जगताप, किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, इतिहास अभ्यासक ज्योती तोरसकर, अशोक सावंत, विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, भाऊ सामंत, बाबा मोंडकर, विकी तोरसकर, अन्वेषा आचरेकर, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, माजी नगरसेवक गणेश कुशे, आप्पा लुडबे, पूजा सरकारे, खरेदी-विक्री संघ संचालक आबा हडकर आदींसह शेकडो नागरिक या जल्लोषात सहभागी झाले होते. उपस्थितांना विजय केनावडेकर यांनी जिलेबी देत आनंद साजरा केला.