

कणकवली : ज्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला रोजगार निर्मिती आणि गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्राला देशात अग्रेसर बनवले आहे, त्या मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे आयोजित रोजगार मेळाव्याचा उपक्रम निश्चित कौतुकास्पद आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून कणकवली व सिंधुदुर्ग परिसरात उपलब्ध होणार्या नोकर्या शैक्षणिक पात्रतेनूसार निवडण्याची संधी मुलांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या काळात जिल्हयातील बेरोजगारांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकासाचे अनेक उपक्रम राबवले जातील, अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी रोजगार मेळावा शुभारंभ प्रसंगी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्रालयाच्या पुढाकाराने राज्यात मंगळवारी 100 रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग आणि कणकवली कॉलेज यांच्या विद्यमाने कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन मंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सौ. राजश्री साळुंखे होत्या. कणकवली कॉलेजचे प्रा. युवराज महालिंगे, जिल्हा कौशल्य विकास केंद्र सहा.आयुक्त भैयाजी येरमे, जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी अनिल मोहारे, जिल्हा कौशल्य विभाग समन्वयक आमीन तडवी, प्रा. हरी भिसे यांच्यासह उद्योजक, कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मंत्री नीतेश राणे म्हणाले, या रोजगार मेळाव्याचा उपक्रम निश्चितपणे कौतुकास्पद आहे, परंतू जर त्याची काही दिवस अगोदर प्रचार, प्रसिद्धी झाली असती तर मोठ्या संख्येने बेरोजगार उपस्थित राहिले असते. विविध महामंडळे, विविध कंपन्या, विविध व्यवसाय यामध्ये चांगल्या आणि दर्जेदार नोकर्या उपलब्ध आहेत, त्याचा लाभ बेरोजगार मुलांनी घ्यावा. वाढवण बंदरासाठी आवश्यक मनुष्यबळाकरिता कौशल्य विकासाचे कोर्सेस आयटीआयमध्ये सुरू करणार असल्याचे मंत्र्यांनी सांगत मेळाव्याला शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य युवराज महालिंगे यांनी सध्याच्या काळात रोजगाराच्या संधी कुठल्या क्षेत्रात उपलब्ध आहेत याचा विचार करून आणि मार्केटमध्ये काय हवे आहे हे लक्षात घेवून तसे शिक्षण, प्रशिक्षण मुलांनी घेणे आवश्यक आहे तरच रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. महाविद्यालयाच्या वतीने डॉ. राजश्री साळुंखे यांनी पालकमंत्र्यांचा सत्कार केला. रोजगार विभागाच्यावतीने उद्योजकांचा गौरव करण्यात आला. मेळाव्याला बेरोजगार युवक, युवतींची मोठी उपस्थिती होती.
रोजगार मेळाव्यात मार्गदर्शन करताना डॉ. राजश्री साळुंखे म्हणाल्या, सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असून शिक्षणाबरोबरच विविध प्रकारचे कौशल्य मुलांमध्ये असणे आवश्यक आहे. कौशल्यभिमुख शिक्षण असेल तरच मुलांना उज्ज्वल भवितव्य आहे. तल्लख बुद्धी, मनगटात बळ आणि देशाभिमान असेल तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. देशाचे भवितव्य युवकांच्या हाती आहे.