

सिंधुदुर्ग : अजित सावंत
'आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो', असे लोकगीत कोकणातील आंब्याचा हंगाम सुरू झाला की म्हटले जाते. मात्र, यंदा कोकणचा राजा झिम्मा खेळलाच नाही. कारण केवळ पाच ते दहा टक्के पीक या हंगामात हाती येणार आहे. निसर्गाच्या लहरीपणाने हा घात केला आहे. त्यामुळे बागायतदार हवालदिल झाला आहे. सरकारने तातडीने मदत करावी म्हणून तो रस्त्यावर उतरला आहे.
मार्च महिना अर्धा संपला तरी आंबा बाजारात दिसत नाही. निर्यात तर ठप्पच झाली आहे. मशागत आणि फवारणीसाठी लाखो रुपये खर्च केलेल्या या शेतकऱ्यांचे काय होणार, हा प्रश्न आहे. गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने फळांचा राजा असलेला हापूस आंबा अवकाळी पाऊस, जागळ हवामान, धुके, अती थंडी आणि अती उष्णता यामुळे गंभीर संकटात सापडला आहे.
यंदा चांगल्या थंडीमुळे आंब्याला चांगला मोहोर आल्याने दरवर्षीपेक्षा अधिक उत्पन्न येईल, असा अंदाज होता. त्यासाठी शेतकरी व बागायतदारांनी चांगल्या फवारण्या केल्या; मात्र लांबलेली कडाक्याची थंडी, वाढलेले तापमान आणि दाट धुके यामुळे मोहोरावरील नर-मादी फुलांचे गुणोत्तर बिघडले. मादी फुलांचे प्रमाण घटल्याने परागीभवनावर परिणाम झाला आणि फलधारणा मोठ्या प्रमाणात घटली. त्यातच कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढला.
परिणामी यंदा ५ ते १० टक्केच उत्पन्न हाती येणार असून या अस्मानी संकटामुळे शेतकरी व बागायतदार हवालदिल झाला आहे. अधिकचे उत्पन्न तर दूरच, केलेल्या फवारणी आणि मशागतीचा खर्चही मिळणे दुरापास्त बनले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा हा कोकणातील प्रमुख आंबा उत्पादक जिल्ह्यांपैकी एक आहे. येथे सुमारे ३४ हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा पिक घेतले जाते. गेल्या २५ वर्षांत आंबा पिकाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. सिंधुदुर्गातील 'देवगड हापूस' जगप्रसिद्ध आहे. गेल्या दोन वर्षांपर्यंत किमान २५ ते ३० टक्के तरी पीक हाती येत होते; मात्र यंदा केवळ ५ ते १० टक्केच पीक मिळेल, असा अंदाज आहे.
अचानक वाढलेली उष्णता कारणीभूत : व्ही. के. सावंत
मोहोर चांगला आला; मात्र त्यानंतर उष्णता अचानक वाढली. मादी फुलांचे प्रमाण कमी झाल्याने म्हणावे तसे परागीकरण झाले नाही. त्यात मोहोर करपून गेला. सकाळच्या दाट धुक्यामुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे योग्य प्रमाणात फलधारणा झाली नसल्याचे कृषी तज्ज्ञ व्ही. के. सावंत यांनी सांगितले.
मादी फुलांचे प्रमाण कमी : काका ढोके
देवगड येथील आंबा बागायतदार काका ढोके यांनीही या घटलेल्या आंबा पिकाच्या उत्पादनाबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “यावर्षी मोठ्या प्रमाणावर फुलोरा येऊनही कडक थंडी, कडक ऊन आणि दवामुळे पिकावर मोठा परिणाम झाला. मादी फुलांचे प्रमाण कमी झाल्याने मोहोर बांझ झाला. नंतर मोठ्या प्रमाणात तो करपूनही गेला.