Road Construction | सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणाला 1.34 कोटी रु. निधी
ओरोस : अनेक वर्षांच्या मागणीनंतर आणि पालकमंत्री, खासदार तसेच आमदार यांच्या दबावानंतर सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणाला विकास कामांसाठी निधी मिळाला आहे. सिंधुदुर्गनगरी मधील 6 रस्त्यां ची काम करण्यासाठी 1 कोटी 9 लाख रुपये तसेच दिवाबत्ती यासाठी 25 लाख रुपये असा एकूण 1 कोटी 34 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतची माहिती भाजपच्या ओरोस मंडळ अध्यक्षा सुप्रिया वालावलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्गनगरी येथील भाजपच्या ‘वसंत स्मृती’ कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सौ. वालावलकर बोलत होते. सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण समिती सदस्य महेश पारकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष वालावलकर, ओरोस बुद्रुक ग्राम पंचायत सदस्या राजश्री नाईक, तेजश्री राऊळ आदी उपस्थित होते.
सौ. वालावलकर म्हणाल्या, जिल्ह्याची राजधानी असलेल्या सिंधुदुर्गनगरी येथील रहिवाशी संख्या वाढावी यासाठी प्राधिकरणने भूखंड वितरण केले. हे भूखंड विकत घेत अनेकांनी आयुष्याची जमापुंजी खर्च करीत निवास व्यवस्था उभारली. मात्र, या रहिवाशांना नागरी सुविधा मिळत नाहीत. रस्ते खड्डेमय बनले आहेत. दिवाबत्ती सुरळीत नाही. त्यामुळे येथील रहिवाशी संघाने तसेच राजकीय पुढार्यांनी वारंवार जिल्हाधिकार्याकडे याबाबत लक्ष वेधले होते. तरीही प्राधिकरण या गैरसोयीकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे पालकमंत्री नीतेश राणे, खा. नारायण राणे, आ. नीलेश राणे यांचे याकडे लक्ष वेधण्यात आले होते. यासाठी प्राधिकरण समिती सदस्य तथा भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महेश पारकर यांनीही प्रयत्न केले. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी प्राधिवकरणसाठी 1 कोटी 34 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
यातील 1 कोटी 9 लाख रुपये रस्त्यांसाठी मंजूर करण्यात आला आहे. तर 25 लाख रुपये दिवाबत्तीसाठी मंजूर करण्यात आले आहेत. यातून एकूण 6 रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. या कामांचा शुभारंभ दसर्याच्या कालावधीत पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे सौ. वालावलकर यांनी सांगितले.
नागरी सुविधेमधून 20 लाख रुपये
ओरोस बुद्रुक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील प्राधिकरणमध्ये नागरी सुविधेअंतर्गत सभामंडप उभारण्यासाठी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. येथील नागरिकांची ही मागणी अनेक वर्षांची होती. ती आता पूर्ण होणार आहे, असे सुप्रिया वालावलकर यांनी सांगितले.

