सिंधुदुर्ग : विजघर येथे टस्‍कराकडून केळी,सुपारी अन् माडाचे नुकसान

टस्‍कराकडून नुकसान
टस्‍कराकडून नुकसान

दोडामार्ग : पुढारी वृत्तसेवा विजघर परिसरात दहा दिवसांपूर्वी आगमन झालेल्या टस्कराने अक्षरशः उच्छाद मांडला आहे. आज (मंगळवारी) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हा टस्कर अन्नाच्या शोधात थेट घरालगत आला. सिद्धेश राणे यांच्या केळी आणि माडाची झाडे त्‍याने उध्वस्त केली. टस्कर दिवसादेखील थेट लोकवस्तीजवळ येऊ लागल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

विजघर परिसरात दहा दिवसांपूर्वी टस्कराचे आगमन झाले व शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. कारण या टस्कराने परिसरात दाखल होताच तेथील शेतकऱ्यांचे केळी, सुपारी व माडांचे अतोनात नुकसान केले. टस्करा पाठोपाठ इतर हत्ती येण्याची शक्यता तेथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी वर्तविली होती. ही शक्यता खरी ठरली व चार दिवसांपूर्वी एक टस्कर सोबत एका पिल्लाचे दर्शन ग्रामस्थांना झाले होते. त्यांनी सुपारी व केळी बागायतीत घुसून नुकसान केले होते. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी फक्त एका टस्कराचे पुन्हा दर्शन झाले. त्यामुळे नेमके किती हत्ती आहेत याचा कयास बांधणे मुश्किल झाले आहे.

आज (मंगळवारी) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास या टस्कराचे ग्रामस्थांना पुन्हा बांबर्डे येथे दर्शन झाले. तो टस्कर अन्नाच्या शोधात भर दिवसा सिद्धेश राणे यांच्या थेट घरालगत आला व त्यांचे केळी व माड उध्वस्त केले. यावेळी टस्कराला घरासमोर पाहुन घरातील मंडळी घाबरून गेले. टस्कर आल्याची बातमी परिसरात पसरताच क्षणार्धात ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. त्यांनी आरडाओरडा करून, फटाके फोडून टस्कराला जंगलाच्या दिशेने हुसकावून लावले. सध्या हा टस्कर शेती व फळबागायतींचे अतोनात नुकसान करत असून, वनविभागाने या टस्कराला पिटाळून लावण्याची मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून होत आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news