

ओरोस : आंतरराज्य घरफोडी व चोरी करणार्या दोन सराईत आरोपींना बेंगलोर येथून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. दिशा शंकर मधुकर पवार उर्फ (हडया) आणि राजू मधुकर पवार उर्फ (उड्या) अशी या दोघांची नावे आहेत. या प्रकरणातील अजूनही काही आरोपीचा तपास सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या या दोन्ही आरोपींना पोलिस कस्टडी मिळाली असल्याने त्यांच्याकडून अन्य संशयितांचा शोध घेण्यास दिशा मिळेल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्गनगरी येथे पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. दहीकर बोलत होते. अति.पोलिस अधीक्षक नयोमी साटम, उपअधीक्षक विनोद कांबळी, गुन्हा अन्वेषणचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सावंतवाडी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण आदी उपस्थित होते.
डॉ. दहीकर म्हणाले , 9 जुलै रोजी रात्री सावंतवाडी शहरातील न्यू खासकीलवाड येथे श्रमविहार कॉलनीत घरफोडीचा प्रयत्न झाला. तसेच लक्ष्मीनगर येथील घरासमोरील एक मोटार सायकल व वेलनेस रिसॉर्ट समोरील मोटार सायकल व तेथील दोन मोबाईल अज्ञातांनी लंपास केले. त्या घटनास्थळी दोन पाळ कोयते मिळुन आले होते. यावरुन सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबत सावंतवाडी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक समांतर तपास करीत असताना संशयीत चोरटे कोल्हापुर मार्गे बेंगलोर असा प्रवास करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीनुसार अति.पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तत्काळ बेंगलोर येथे रवाना केले.
12 जुलै रोजी बेंगलोर शहरातील कामासंद्रा भागात लपुन बसलेले शंकर मधुकर पवार उर्फ (हड्या) वय 25 व राजू मधुकर पवार उर्फ ( उडया ) या दोघांना ताब्यात घेवुन सावंतवाडी पोलिस ठाण्यात आणुन त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. संशयीतांकडे अधिक चौकशी करता ते मोहोळ, जि. सोलापूर येथील असल्याचे समजले. त्यांना या गुन्ह्या प्रकरणी अटक करण्यात आनी आहे. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे, त्यामुळे पुढील तपास करण्यात यश येणार असल्याचे डॉ. दहीकर म्हणाले.
पोलिसर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, सावंतवाडीचे उपअधीक्षक विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, अमोल चव्हाण, सहा. निरीक्षक जे. ए. खंदरकर, उपनिरीक्षक अनिल हाडळ, हेड कॉन्स्टेबल डॉमनिक डिसोझा, सदानंद राणे, बस्त्याव डिसोझा व जॅक्सन घोन्साल्वीस, पोलिस अंमलदार प्रथमेश गावडे, धनश्री परब व युवराज भंडारी यांनी ही कारवाई केली.
या आरोपींना यापूर्वी महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यात 30 ते 35 गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रा प्रमाणेच त्यांनी गोवा व कनार्टक राज्यात चोरीचे अनेक गुन्हे केले असून या दोन्ही राज्यांच्या पोलिसांसाठी ते वॉन्टेड आहेत. दोन्ही आरोपी हे घरफोडी व चोरीसाठी सराईत असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी सांगितले.