

प्रमोद म्हाडगुत
सिंधुदुर्ग : ख्रिसमस सण, सलग शुक्रवार सोडून शनिवार, रविवारची सुट्टी आणि नववर्षाच्या आगमनामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील तारकर्ली, देवबाग, चिवला बीच, रॉकगार्डन, देवगड बीच, तारामुंबरी, मिठमुंबरी बीच, वेंगुर्ले बंदर, वेळागर बीच आणि विजयदुर्ग याठिकाणी पर्यटनाचा हंगाम जोमात सुरू झाला आहे. गोव्यातील वाढती गर्दी आणि खर्च टाळण्यासाठी देशभरातील पर्यटकांनी आता स्वच्छ, निसर्गरम्य आणि शांत पर्याय म्हणून सिंधुदुर्गातील किनाऱ्यांवर गर्दी केली आहे.
पर्यटनाचा मानबिंदू ठरलेल्या मालवण, तारकर्ली, देवबाग, आचरा, भोगवे, कुणकेश्वर आदी किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली असून हॉटेल्स, होमस्टे, रिसॉर्टस् जवळपास पूर्णतः भरले आहेत. काही ठिकाणी आगाऊ बुकिंगशिवाय राहण्याची सोय मिळणेही कठीण झाले आहे.
जलक्रीडांचा थरार, निसर्गाचा अनुभव
मालवणच्या दांडी, तारकर्ली आणि देवबाग किनाऱ्यांवर स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, बनाना रायडिंग, पॅरासेलिंग, जेट स्की अशा जलक्रीडांना पर्यटकांकडून मोठी पसंती मिळत आहे. स्वच्छ पाणी, प्रवाळ (कोरल) आणि समुद्री जीवसृष्टी पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक खास तारकर्लीकडे येत आहेत. देवबागमध्ये नदी व समुद्राच्या संगमाचा अनुभव, आयलंड टूर आणि बोटिंग ही विशेष आकर्षणे ठरत आहेत.
इतिहास आणि धार्मिक पर्यटनालाही चालना
पर्यटन म्हणजे केवळ समुद्रकिनारेच नव्हे, तर इतिहास आणि श्रद्धेचे दर्शनही मालवण देते. सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे प्रतीक असलेल्या या किल्ल्याची बोट सफर पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरते आहे. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुड पुतळासुद्धा पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडत आहे. तसेच कुणकेश्वर मंदिर व किनारा येथे धार्मिक पर्यटनासाठी भाविकांचीही लक्षणीय उपस्थिती आहे.
मालवणी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद
पर्यटकांमध्ये मालवणी खाद्यसंस्कृतीबाबत विशेष उत्सुकता दिसून येत आहे. सोलकढी, ताज्या समुद्री माशांचे पदार्थ, कोंबडी-वडे, स्थानिक मसाल्यांची चव यामुळे मालवण, वेंगुर्ले आणि देवगडमधील हॉटेल्स व घरगुती खानावळी गजबजून गेल्या आहेत. स्थानिक मच्छीमार आणि छोटे व्यावसायिक यांनाही या पर्यटन हंगामाचा मोठा फायदा होत आहे.
स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ
पर्यटनामुळे हॉटेल व्यवसाय, वाहतूक, बोट व्यावसायिक, जलक्रीडा केंद्रे, गाईड, स्थानिक विक्रेते यांना मोठी आर्थिक चालना मिळाली आहे. यंदा ख्रिसमस ते नववर्ष कालावधी हा मागील काही वर्षांच्या तुलनेत अधिक चांगला ठरला आहे, असे मत स्थानिक पर्यटन व्यावसायिक व्यक्त करत आहेत.
सुरक्षा व पर्यावरण जपण्याचे आवाहन
पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाकडून जलक्रीडा केंद्रांवर सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात येत आहे. प्रशिक्षित मार्गदर्शक, लाईफ जॅकेट्स, तसेच पर्यटकांसाठी सूचना फलक लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर प्लास्टिकमुक्त किनारे, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी पर्यटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.