Sindhudurg Bank Scheme | सिंधुदुर्ग बँकेच्या योजना व उपक्रम विकासाभिमुख
ओरोस : सिंधुदुर्ग बँकेच्या माध्यमातून एआय प्रणाली सुरू करण्याचा प्रयत्न चांगला असून ही सेवा अधिक गतिमानपणे राबविताना त्याबाबत योग्य खबरदारी घ्यावा, जिल्ह्याचे उत्पन्न वाढीसाठी बँकेच्या माध्यमातून उद्योग, शेती व्यवसाय, प्रोसेसिंग युनिट योजनांवर आदी भर द्यावा, प्रक्रिया उद्योग वाढविण्यासाठी बँकेने सहकार्य करावे, यातून पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आर्थिक उत्पन्नात अधिक भर पडेल, असे विचार जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी मांडले.
सिंधुदुर्गनगरी येथील बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन येथे जिल्हा बँकेच्यावतीने कृषी दिन आणि जिल्हा बँकेचा वर्धापन दिन या औचित्यावर बॅँकेत एआय प्रणालीचा शुभारंभ आणि गुणवंत विद्यार्थी, कर्मचारी आणि विकास संस्थांचे सचिव यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अनिल पाटील हे होते. प्रमुख पाहुणे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, नाबार्डच्या दिपाली माळी, सहकार विभागाचे सोपान शिंदे, बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व सर्व संचालक, बँकेचे सीईओ प्रमोद गावडे, आदीं उपस्थित होते. दीपप्रज्वलन आणि एआय प्रणालीचा शुभारंभ जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्हा सिंधुदुर्ग बँकेचा आलेख नेहमीच चढता राहिला आहे. ‘एआय’प्रणाली ग्राहकांना दर्जेदार व जलद सेवा सेवा मिळू शकेल. मात्र या सेवे बरोबरच बँक अधिकारी व कर्मचार्यांची जबाबदारीही वाढणार आहे. जिल्ह्याचा विकास साधताना जिल्ह्याचे आर्थिक उत्पन्नही वाढले पाहिजे, यासाठी तरुणांना रोजगाराभिमुख कर्ज वितरित करताना आंबा, काजू, कोकम, जांभूळ यासारख्या पिकांवर प्रोसेसिंग करणारी युनिट उभारण्याचा बँकेने प्रयत्न करावा. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने पर्यटन पूरक उद्योग, व्यवसाय कसे वाढतील, यासाठीही बँकेने आि र्थक योजना आखाव्यात, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर म्हणाले, यापूर्वी सहकार म्हटला की फक्त पश्चिम महाराष्ट्र डोळ्या समोर येतो. परंतु गेल्या चार वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सहकार मोठ्या प्रमाणात वाढीस लागला आहे. आणी याचे श्रेय सिंधुदुर्ग बँकेला आहे. हा सहकार टिकविण्यासाठी नाबार्ड आणि सहकार विभागाचे उत्तम सहकार्य मिळत आहे. बँकेच्या माध्यमातून ठेवीदारांसाठी ‘वरद’ सारखी योजना सुरू करण्यात येत आहे. दुग्ध व्यवसाय वाढीसाठी बॅंकेने राबवलेल्या योजनांचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत.
नाबार्डच्या दिपाली माळी म्हणाल्या, जिल्ह्यात 214 पैकी 150 विकास संस्था संगणकीकरण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा जिल्हा बँकेने प्रयत्न केला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील विकास संस्था संगणकीकरण कृत झाली आहे.
अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले, बँकेचे अधिकारी, कर्मचारी आणि संचालक यांच्या सहकार्यातून दर्जेदार उपक्रमाची ग्राहकांना सेवा देण्याची संधी तसेच वरद सारखी ठेव योजना शुभारंभ बँकेच्या वर्धापनदिनी करत आहोत. आठ टक्के व्याज दराने ही योजना राबविली जात असून अधिकाधिक योजना चालावी यासाठी महिला, विधवा महिला यांच्यासाठी जादा व्याजदर दिला जाणार आहे विकास संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विकास संस्थांचे संघटन करून पारदर्शक कारभार करण्याचा प्रयत्न आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून विकास संस्था प्रमाणपत्र, धनादेश वाटप केले.

