

बांदा : सिंधुदुर्गवासीयांसाठी ‘आरोग्यदायिनी’ म्हणून ओळखली जाणारी ‘108’ अॅम्ब्युलन्स सेवा आज स्वतःच ‘ऑक्सिजन’वर आली आहे. अपघात, हृदयविकार, गर्भवती महिला व तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी धावून येणार्या या सेवेच्या अॅम्ब्युलन्स तांत्रिक बिघाड आणि देखभाल अभावामुळे रुग्ण, चालक आणि डॉक्टरांच्या जीवाशी खेळत असल्याचे चित्र आहे. अचानक चालती अॅम्ब्युलन्स पेटणेे, धक्का मारल्याशिवाय सुरू न होणे, कधी दुसर्या अॅम्ब्युलन्सच्या मदतीने टोचन करने, अशा प्रकारांमुळे रुग्णांसह त्यांचे नातेवाईक, कर्मचारी व डॉक्टर्सनाही नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दोन वर्षांपूर्वी मळगाव-नेमळे महामार्गावर 108 अॅम्ब्युलन्सने अचानक पेट घेतला होता. त्या वेळी गाडीत असलेल्या डॉक्टर आणि चालकाने जीवावर उदार होत गंभीर रुग्णाला बाहेर काढले. रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याने दुसर्या वाहनाने त्याला गोवा-बांबोळी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, या प्रक्रियेत बराच वेळ गेला, उपचारास विलंब झाला आणि अखेरीस रुग्णाचा मृत्यू झाला. ही घटना जिल्ह्यातील ‘108’ सेवेसाठी एक मोठा धक्का होती; परंतु प्रशासनाने त्यातून धडा घेतल्याचे दिसून आले नाही.
काही महिन्यांपूर्वी सावंतवाडी येथून गोवा-बांबोळी येथे रुग्ण घेऊन जात असताना पुन्हा एकदा 108 अॅम्ब्युलन्सला आग लागली. यावेळीही जीवावर बेतून रुग्णाला बाहेर काढण्यात आले आणि गोव्यातील दुसर्या अॅम्ब्युलन्सने दवाखान्यात नेण्यात आले. सतत अशा घटना घडूनही वाहनांची देखभाल व तांत्रिक तपासणी नियमित होत नसल्याचे स्पष्ट दिसते.
अलीकडेच एक लज्जास्पद घटना घडली. रुग्णाची प्रकृती गंभीर असताना 108 अॅम्ब्युलन्स सुरूच होत नव्हती. शेवटी रुग्णाचे नातेवाईक व ग्रामस्थांनी मिळून गाडीला धक्का मारून सुरू केले. आपत्कालीन सेवेसाठी असलेली ही स्थिती नागरिकांच्या मनात भीती आणि अविश्वास निर्माण करते.
गोव्यातून सिंधुदुर्गकडे येत असताना एका 108 अॅम्ब्युलन्सने दुसर्या 108 अॅम्ब्युलन्सला रस्सीने ओढत नेत असल्याचे दृश्य पाहून नागरिकांनी उपरोधिक टीका केली ‘108 लाच 108 ची’ गरज लागली आहे! ही परिस्थिती केवळ हास्यास्पदच नव्हे तर धोकादायकही आहे.
जिल्ह्यातील अनेक अॅम्ब्युलन्स गाड्यांची तांत्रिक स्थिती अत्यंत खराब आहे. गाड्यांच्या पत्र्यांना गंज, दरवाजे तुटलेले, काही भाग दोरीने बांधलेले, ऑक्सिजन सिलिंडर, स्ट्रेचर, सेफ्टी बेल्ट खराब, एसी बंद किंवा निकामी, इंजिन आणि ब्रेकमध्ये बिघाड, अशा स्थितीत रुग्णाला सुरक्षित आणि वेळेत रुग्णालयात पोहोचवणे हेच मोठे आव्हान ठरत आहे.
या सेवेतील रुग्णच नव्हे, तर चालक आणि वैद्यकीय कर्मचारीही धोक्यात आहेत. ब्रेक फेल, टायर फुटणे किंवा इंजिन गरम होणे यामुळे रस्त्यात अपघात होण्याची शक्यता वाढते. रात्रीच्या वेळी दुर्गम भागात अॅम्ब्युलन्स बंद पडल्यास हल्ला किंवा अपघाताचा धोका अधिक वाढतो.
108 वरील चालक आणि डॉक्टर यांना या घटनांबाबत विचारणा केली असता, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यांच्या या मौनामुळे परिस्थिती किती गंभीर आहे आणि अंतर्गत पातळीवर किती नाराजी आहे, याची कल्पना येते.
जिल्ह्यातील ‘108’ अॅम्ब्युलन्स सेवेत धावणार्या वाहनांच्या टायरची अवस्था अतिशय जीर्ण झाल्याचे दिसून आले आहे. काही वाहनांमध्ये टायर इतके झिजलेले आहेत की, प्रवासादरम्यान ते फुटण्याची शक्यता निर्माण होते. अशी परिस्थिती उद्भवल्यास गाडीतील डॉक्टर, चालक तसेच रुग्ण यांचे प्राण धोक्यात येऊ शकतात.