

वैभववाडी : उपळे येथील सिद्धेश्वर मंदिरातील घंटा चोरट्याने चोरून नेल्या आहेत. याबाबत अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी ही घटना उघडकीस आली.
उपळे येथील श्री सिद्धेश्वर मंदिर हे लोक वस्तीपासून दूर अंतरावर सिद्धाच्या राईत आहे. या मंदिरामध्ये येणारे भाविक हे श्रद्धेने मंदिरास घंटा दान करत असतात. त्यामुळे या मंदिरात अन्य मंदिरांच्या तुलनेत जास्त घंटा आहेत. सध्या या मंदिरात लहान मोठ्या 224 पितळी घंटा होत्या. या मंदिरात यापूर्वीही चोरीचे प्रकार घडले होते. मंदिराचे पुजारी अनंत कृष्णा गोसावी (रा. उपळे-डांगेवाडी) हे दर सोमवारी मंदिरात जाऊन पूजा अर्चा करतात.
14 जुलै रोजी सकाळी 7.30 वा. गोसावी हे मंदिरात पूजा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी मंदिरातील सर्व घंटा सुस्थितीत होत्या. त्यानंतर सोमवार 21 जुलै रोजी गोसावी हे पुन्हा पूजा करण्यासाठी मंदिरात गेले असता त्यांना काही घंटा कमी असल्याचे दिसले. त्यांनी तपासणी केली असता मंदिरातील एकूण 63 पितळी घंटा कमी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
याबाबत गोसावी यांनी गावातील प्रमुख व्यक्ती असलेल्या विजय जाधव, शैलेंद्र परब, महेश नागले, देवानंद पलांडे व पोलिसपाटील स्वप्निल सकपाळ यांना माहिती दिली. त्यानंतर अनंत गोसावी यांनी पोलिस ठाण्यात येऊन घंटा चोरीबाबत रितसर तक्रार दाखल केली.अधिक तपास भुईबावडा दूरक्षेत्रचे पोलिस हेडकॉन्स्टेबल गणेश भोवड करीत आहेत.