

कणकवली : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेचे पदाधिकारी सिद्धेश परब यांना ड्रग, अमली पदार्थप्रकरणात अटक केली आहे. मात्र, त्या प्रकरणाबाबत माहिती घेतली असता प्रत्यक्षात वेगळीच चर्चा ऐकायला मिळत आहे. सिद्धेश परब यांनी जिंदाल प्रकल्पाला विरोध केला होता. गुपचूपपणे ड्रोन शूटिंगद्वारे सर्व्हे करण्यासाठी आलेल्यांना श्री. परब यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने पकडले होते. त्यामुळेच त्यांना यात अडकवले गेले असण्याची शक्यता आहे.
ड्रग प्रकरणात गुंतलेल्यांच्या मागावर अद्यापही पोलिस जात नाहीत. त्यामुळे प्रसंगी उद्धवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला आहे. याबाबतच्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, सिद्धेश परब हे जरी सत्ताधारी शिंदे सेनेचे पदाधिकारी असले तरी त्यांनी त्या भागात लादल्या जाणाऱ्या प्रकल्पाविरोधात आवाज उठविला होता.
तिथे जिंदालचा प्रकल्प येणार होता, त्याचे ड्रोन शूटिंगद्वारे सर्व्हेसाठी काही लोक आणलेले होते. त्यांना सिद्धेश यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने पकडून ठेवले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मोर्चाही काढण्यात येणार होता. यासाठीही सिद्धेश परब यांनी पुढाकार घेतला होता. मात्र, हा मेळावा तसेच मोर्चा होऊ नये म्हणून पालकमंत्रीही तिथे होते.
अखेर पालकमंत्र्यांना मंदिरात आम्ही जनतेचा विरोध असेल तर प्रकल्प आणणार नाही, असे सांगावे लागले होते. एकंदरीत हा प्रकार पाहता, वरील विरोध प्रकरणातून श्री. परब यांना ड्रग प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न केला आहे, असे वाटते. असाच आमच्या गणेश गावकर व काही लोकांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर अॅट्रॉसिटीची केस दाखल केली आहे.
सत्ताधारी पक्षाच्याच लोकांना एखाद्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर नेत्यांना कंटाळलेल्या सत्ताधारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पण आता विनाशकारी प्रकल्पाच्या विरोधात उभं राहण्याची गरज आहे. सिद्धेश परब यांना नाहक गोवण्यात येत असेल तर प्रकल्पाच्या विरोधात असलेली जनता त्याच्या पाठीमागे आहे. अनेक ठिकाणी अमली पदार्थ, दारू विक्री करणारे सत्ताधाऱ्यांचेच काही कार्यकर्ते आहेत. त्यांना मात्र कोणत्याही प्रकरणात कोणी कसे अडकवत नाही? असा सवाल श्री. उपरकर यांनी केला आहे.