

वैभववाडीः गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये सुट्या पैशांची चणचण भासत आहे. यामुळे व्यापार्यांबरोबरच ग्राहकांची मोठी अडचण होत आहे. कोकणातील प्रमुख सण गणपती उत्सव तोंडावर आला आहे. त्यानंतर दिवाळी सण येत आहे. त्यामुळे बँकांनी सुट्टे पैसे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी जिल्ह्यातील व्यापार्यांकडून करण्यात येत आहे.
चलनातील 50, 20, 10 रुपयांच्या नोटा व 20, 10, 5, 2 रुपयांची नाणी गेल्या काही महिण्यात कमी झाल्याचे व्यापार्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे व्यापारी व ग्राहकांची अडचण होत आहे. सुट्या पैशाच्या अडचणीमुळे अनेकवेळा ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. ग्राहकांनी वस्तू खरेदी केल्यानंतर उर्वरित पैसे देण्यासाठी व्यापार्यांकडे सुटे पैसे नसतात.
केंद्र सरकारने डिजिटल व्यवहार करण्यावर भर दिला आहे. शहरात मोठया प्रमाणात डिजिटल आर्थिक व्यवहार नागरिकांकडून केले जातात. मात्र ग्रामीण भागात आजही नागरिक रोख आर्थिक व्यवहार करतात. डिजिटल आर्थिक व्यवहार करण्यासाठी स्मार्ट फोन व ते वापरण्याचे तंत्र वयोवृद्ध व अशिक्षित नागरिकांना अवगत नाही. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात डिजिटल व्यवहार करण्यासाठी आवश्यक नेटवर्क नसल्यामुळे डिजिटल व्यवहार करणारांची अनेकवेळा पंचायत होते. खात्यात पैसे असूनही नेटवर्कमुळे डिजिटल माध्यमातून आर्थिक व्यवहार पूर्ण करू शकत नाही. अशावेळी त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो.
आता कोकणातील प्रमुख सण गणपती दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या काळात बाजारपेठत मोठी आर्थिक उलाढाल होत असते. यावेळी सुट्ट्या पैशा अभावी होणारी ग्राहक व व्यापार्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी व्यापारी करीत आहेत. व्यापार्यांनी यासाठी बँकांना लेखी पत्र देऊन मागणी केली आहे.
एखाद्या ग्राहकांनी वस्तू घेतल्यानंतर त्याला देण्यासाठी उर्वरित सुटे पैसे नसल्यामुळे खूपच अडचण होत आहे. वैभववाडी तालुक्याचा विचार करतांना हा ग्रामीण तालुका आहे. आजही बहुतांश लोक हे आर्थिक व्यवहार रोख स्वरूपात करतात. डिजिटल व्यवहार करणार्यांना सुद्धा विस्कळीत मोबाईल नेटवर्कचा फटका बसतो. नेटवर्कमुळे व्यवहार करतांना अडचण होते. त्यामुळे बँकानी सुट्टे पैसे उपलब्ध करून द्यावेत, अशी आमची मागणी आहे.