

माणगाव : माणगाव खोर्यातील पावसाळ्यात सातत्याने पाण्याखाली जाणारा दुकानवाड येथील कमी उंचीच्या पुलाला शिवापूर-बोथयेवाडी हा एकमेव पर्यायी रस्ता होता. परिसरातील उपवडे, वसोली, शिवापूर व अंजिवडे या चार गावांना महत्त्वपूर्ण ठरणारा व अतिवृष्टीकाळात उपयुक्त असलेला रस्ता आता जीवघेणा बनला आहे. परिसरातील भूस्खलनामुळे रस्त्यावर ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या असून, सातत्याने दरडीचे दगड या रस्त्यावर कोसळत असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. शासनाच्या अनास्थेचे बळी ठरलेल्या या रस्त्याच्या दुर्दशेमुळे वरील चार गावांतील लोकांचा वनवास कधी संपणार? असा प्रश्न निर्माण झाला असून किमान चतुर्थीपूर्वी तरी या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थ व वाहनधारकांनी केली आहे.
माणगाव खोर्यातील दुकानवाड पूल अतिशय कमी उंचीचे असल्याने पावसाळ्यात हा पूल सातत्याने पाण्याखाली जातो. या पुलापलीकडे उपवडे, वसोली, शिवापूर व अंजिवडे ही गावे आहेत.
या गावातील ग्रामस्थांना कामानिमित्त तसेच विद्यार्थ्यांना शाळेनिमित्त माणगाव, कुडाळ व सावंतवाडी येथे नियमित प्रवास करावा लागतो. मात्र कमी उंचीच्या दुकानवाड पुलामुळे पावसाळ्यात ग्रामस्थांना अनेकवेळा अडकून पडावे लागते. पाण्याखाली गेलेल्या पुलावरील पाणी कधी ओसरणार याच प्रतीक्षा करत ग्रामस्थ व विद्यार्थी तासन्तास ताटकळत उभे असतात. अशा स्थितीत ग्रामस्थांना शिवापूर -बोथयेवाडी रस्ता कामी येतो. हा रस्ता पुढे शिरशिंगे-कलंबिस्त मार्गाला जोडत असल्याने नागरिकांना कोलगाव-सावंतवाडी येथे जाता येते. तेेथून कुडाळलाही येता येते.
अतिवृष्टीकाळात वरील गावातील ग्रामस्थ या मार्गाने सावंतवाडी अथवा कुडाळ गाठतात. मात्र सध्यस्थितीत हा रस्ताही धोकादायक बनला आहे. या रस्त्यावर भूस्खलनाप्रमाणे मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. अशा स्थितीत हा रस्ता कधीही वाहून किंवा खचून जाण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत अपघाताचाही धोका आहे. एवढेच नाही, तर काही ठिकाणी रस्त्यावर दरड कोसळत असते. काही ठिकाणी हा रस्ता वाहून गेला आहे. तर काही ठिकाणी गटार बुजले आहे. अशा स्थितीत ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करतात.
आता गणेशोत्सव जवळ आला आहे. अशावेळी लोकांना खरेदीसाठी व इतर कामासाठी माणगाव, सावंतवाडी, कुडाळ या बाजारपेठांच्या ठिकाणी जावे लागणार आहे. त्यामुळे किमान चतुर्थीपूर्वी या रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी या चार गावांतील ग्रामस्थांची आहे. अतिवृष्टीत एकमेव पर्यायी मार्ग असलेला हा रस्ता ही जीवघेणा ठरत असल्याने ग्रामस्थ व वाहनधारक वैतागले आहेत. या चार गावांतील लोकांना एखाद्या रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
खोर्याला जोडणारा दुकानवाड पूल सातत्याने पाण्याखाली
अतिवृष्टीकाळात बाजारपेठा गाठण्यासाठी बोथयेवाडी रस्ता एकमेव पर्याय
सद्यस्थितीत रस्त्याला ठिकठिकाणी भेगा
रस्त्यावर अनेक ठिकाणी दरडींचा धोका
या रस्त्याच्या काही भाग वनसंज्ञेत येत असल्याने अशा भागात केवळ खडीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय होते. शासन एकीकडे वेगवेगळ्या सुपरफास्ट महामार्गासाठी करोडो रुपये खर्च करत आहे. मात्र, दुसरीकडे ग्रामीण जनतेची लाईफलाईन असलेल्या अशा रस्त्यांकडे दुर्लक्ष करत आहे. या रस्त्याच्या डागडुजीकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.