

देवगड : देवगड-जामसंडेच्या पाणी प्रश्नावरून उद्धव ठाकरे शिवसेना आक्रमक झाली. गुरुवारी ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी न.पं.वर धडक देत ऐन पावसाळ्यात भेडसावत असलेल्या पाणी समस्येबाबत प्रशासनाला धारेवर धरले. सुरळीत पाणीपुरवठा होत नसेल, तर टँकरने पाणीपुरवठा करा, अशी मागणी ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारही यावेळी देण्यात आला.
देवगड-जामसंडेचा पाणीप्रश्न ऐन पावसाळ्यात गंभीर बनला आहे. सहा-सहा दिवस नागरिकांना पाणी मिळत नसून ऐन पावसाळ्यात पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. या गंभीर प्रश्नी पालकमंत्रीही गंभीर नाहीत. वारंवार पाईपलाईन फुटणे व दहिबांव येथे वरचेवर उद्भवणारी वीजेची समस्या, यामुळे हा पाणीप्रश्न गंभीर बनत आहे.अश्या परिस्थितीत देवगड न.पं.ला कोण वाली नाही का? असा सवाल सुशांत नाईक यांनी केला. ठाकरे सेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या प्रश्नी न. पं. चे प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण लोंढे यांना धारेवर धरले.
न. पं. पाणीपुरवठा विभाग प्रमुख चारू पारकर यांनी दहिबांव येथे पावसाळ्यात वारंवार विद्युत पुरवठा बंद पडत असून नळयोजनेची जीर्ण पाईपलाईन वरचेवर फुटत असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याचे सांगितले. नळयोजना दुरूस्तीसाठी 9 कोटी रूपये मंजूर झाले आहेत. सध्या हे काम वर्कऑर्डर प्रक्रियेत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र जोगल यांनी शिरगाव-पाडाघर येथून पाणीपुरवठा करण्याची मागणी केली.असे सांगितले. यावर चारू पारकर यांनी शिरगाव नळयोजनेच्या ठिकाणीही वीजेची समस्या भेडसावत असून नळयोजनेवर असलेली इतर गावे पाणी चोरी करतात असे सांगितले.
यावर श्री. नाईक व श्री. जोगल यांनी याबाबत पोलिस तक्रार का केली नाही? असा प्रश्न केला. नागरिकांचा पाणीप्रश्न महत्वाचा आहे. मात्र त्याकडे गांभीर्यांने लक्ष दिले जात नाही. पावसाळ्यात नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे हे दुर्दैर्वी आहे. हा पाणीप्रश्न प्राधान्याने सोडवावा. दुरूस्तीचेे काम लवकरात लवकर सुरू करा, अशी मागणी केली.
तालुकाप्रमुख रवींद्र जोगल, जयेश नर, महिला संघटक सौ.हर्षा ठाकूर, माजी सभापती सौ.रेश्मा सावंत, विभागप्रमुख विकास कोयंडे, महेंद्र भुजबळ, नगरसेवक तेजस मामघाडी, नितीन बांदेकर, गणेश कांबळी, गौरव सावंत, मंगेश फाटक, बाळा कणेरकर, काका जेठे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महिला आघाडीप्रमुख हर्षा ठाकूर यांनी रस्ते व गटार बांधणे यापलिकडे नगरपंचायतीला काहीही दिसत नाही. शहरात सुरू असलेल्या गटारांची कामेही अर्धवट स्थितीत आहेत. नगरसेवक ठेकेदाराकडून काम सुरू होण्याचा अगोदरच टक्केवारी मागतात. यामुळे ठेका घेण्यास कोणीही पुढे येत नाही, असा आरोप केला.