Missing Youth | शिरंगे-बोडण येथील तरूण गोवा येथून मुलांसह बेपत्ता
दोडामार्ग : शिरंगे - बोडण गावचा रहिवासी व सध्या कामानिमित्त गोव्यात कुडतरी सालसेत येथे आपल्या बायकोमुलांसोबत राहत असलेला अभिमन्यू अर्जुन नाईक (38) हा चार दिवसांपूर्वी आपल्या अकरा वर्षीय मुलासमवेत बेपत्ता असल्याची फिर्याद त्याची पत्नी अनुष्का अभिमन्यू नाईक हिने कुडतरी पोलिस ठाणे (गोवा) येथे दिली आहे. दरम्यान गोवा पोलिसांना अभिमन्यूचे लोकेशन तेरवण- मेढे येथे आढळल्याने त्याचा दोडामार्ग पोलिसांसह शोध घेत आहेत.
पत्नी अनुष्का हिने दिलेली माहिती नुसार ती वास्को- गोवा येथे बहिणीकडे कही कामानिमित्त छोट्या मुलाला सोबत घेऊन गेली होती. घरी आल्यानंतर नवरा व मोठा मुलगा आकाश आढळून न आल्याने तिने नवरा अभिमन्यू याला फोन केला. परंतु त्याला प्रतिसाद न मिळाल्याने आजुबाजूला चौकशी केली. मात्र कोणालाच माहिती नव्हते. आपण आपल्यापरीने नातेवाईकांना फोन केले. परंतु अभिमन्यू कुठेच नसल्याचे स्पष्ट झाले.
अखेर नवरा व मुलाची काळजी वाटू लागल्याने आपण पोलिसांशी संपर्क साधला आहे. दरम्यान अनुष्काच्या फिर्यादीच्या अनुषंगाने कुडतरी पोलिसांनी तपास सुरू केला असता त्यांचे मोबाईल लोकेशन दोडामार्ग तालुक्यातील तेरवण- मेढे याठिकाणी दिसले. त्यामुळे कुडतरी पोलिसांनी दोडामार्ग पोलिसांशी संपर्क साधला असून गोवा व दोडामार्ग पोलिस यंत्रणा अभिमन्यू व त्याच्या मुलाचा शोध घेत आहेत. त्यांच्या बाबत काही माहिती आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

