

सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या मागणीसाठी सुरू असलेल्या लढाईने आता तीव्र रूप धारण केले आहे. कोकणवासीयांनी डिजिटल माध्यमाचा वापर करून सरकारला धारेवर धरले आहे. सागर तळवडेकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अवघ्या 24 तासांत 264 नव्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. यामुळे एकूण तक्रारींचा आकडा 76 दिवसांत 1336 वर पोहोचला आहे.
या मोहिमेचे समन्वयक सागर तळवडेकर यांनी कोकणवासीयांचे आभार मानताना सांगितले, कोकणवासीय आपल्या हक्कासाठी डिजिटली साक्षर होत आहेत, ही आनंदाची बाब आहे. रेल मदत पोर्टल, जनता दरबार आणि डिजिटल सह्यांच्या मोहिमेला मिळालेला हा प्रतिसाद प्रशासनाचे डोळे उघडणारा ठरेल. रेल्वे मंत्रालयाला हजारो पत्रांचा मारा, राष्ट्रपती आणि माननीय प्रधानमंत्र्यांकडे थेट दाद. व मंत्री महोदयांच्या कार्यक्रमात तक्रारींचा पाऊस याद्वारे हक्काच्या टर्मिनससाठी लोकचळवळ तीव्र झाली आहे.
76 दिवसांत 1336 तक्रारी
काही दिवसांपूर्वीपर्यंत तक्रारींची संख्या 1072 होती, मात्र केवळ एका दिवसात आलेल्या प्रतिसादाने रेल्वे प्रशासन हादरले आहे. सावंतवाडी टर्मिनस व्हावे, या मागणीसाठी ईमेल मोहिमेपासून सुरू झालेला हा लढा आता थेट राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्रालयापर्यंत पोहोचला आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पूर्ण क्षमतेने कार्यान्वित व्हावे, हा विश्वास या वाढत्या प्रतिसादामुळे अधिक दृढ झाला आहे. कोकणवासीय आता आपल्या रेल्वे हक्कांसाठी केवळ गप्प न बसता डिजिटल शस्त्र प्रभावीपणे वापरत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.