

नांदगाव : तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम आत काहीच ठिकाणी शिल्लक आहे. यात कासार्डे-आनंदनगर हद्दीतील शासकीय कागदोपत्री भूसंपादनाची नोंद आढळून येत नसल्याने रुंदीकरण कामकाजाला स्थानिक भूधारकांनी तीव्र विरोध केला होता. जोपर्यंत प्रस्तुत महामार्गाकरिता संपादीत जमिनीचे कायदेशीर भूसंपादन होऊन नुकसानभरपाई मिळत नाही, तोपर्यंत महामार्ग रुंदीकरणाचे कामकाज सुरू न करण्याचा लेखी इशारा प्रशासकीय यंत्रणेस दिले होता. आता यावर तोडगा निघाला असून जेवढे भूसंपादन आहे, तेवढ्याच भागात महामार्गाचे काम करावे व नुकसानभरपाईबाबत शासन निर्णयानुसार निर्णय झाला असल्याचे हायवे प्राधिकरण याच्याकडून सांगण्यात आले. यामुळेच गेली अनेक महिने बंद असलेले आनंदनगर येथील काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.
पश्चिम महाराष्ट्र व तळकोकणाला जोडणाऱ्या पूर्वीच्या विजयदुर्ग-कोल्हापूर राज्य महामार्ग क्र. 115 पैकी तळेरे-कोल्हापूर या मार्गाला दर्जोन्नती मिळून त्याचे नामांतर राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 असे करण्यात आले. प्रस्तुत महामार्गाच्या रुंदीकरणाचे कामकाज सुरू आहे. यातील कणकवली तालुक्यातील तळेरे, कासार्डे आनंदनगर व वैभववाडी तालुक्यातील नाधवडे, कोकीसरे, एडगाव, करूळसह पुढे कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातून कोल्हापूर शहराकडे असे प्रस्तुत महामार्गाचे काम सुरू आहे. त्यापैकी मौजे कासार्डे-आनंदनगर हद्दीत महामार्ग नेमका कोणत्या जमीन मिळकतींमधून जातो याची गाव नकाशा, गटबुक नकाशा व शासकीय कागदोपत्री नोंद आढळून येत नसल्याने भूधारक व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येत संघर्ष समितीची स्थापना केली होती. तसेच माजी जि.प.सदस्य संजय देसाई यांनी याबाबत मत्स्य व्यवसाय व बंदर मंत्री तथा पालकमंत्री नीतेश राणे याची भेट घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र सध्या बंद काम युद्धपातळीवर सुरू असून याबाबत राष्ट्रीय महामार्ग उपविभाग खारेपाटणकडून माहिती घेतली तेव्हा पूर्वीचा राज्य मार्ग असून 2020 साली याचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाले असले तरी पूर्वी घेतलेल्या जागेत नवी सिमेंट काँक्रीट महामार्ग बनणार असल्याने अधिकचे भूसंपादन होणार नसल्याचेे सांगण्यात आले होते. यानंतर ग्रामस्थांशी झालेल्या बैठकीत निर्णय होत नसल्याने हे बंद काम होते. मात्र सार्वजनिक उद्दिष्टांसाठी व कामासाठी जमिनी ताब्यात घेतल्यास अशा जमिनीची नुकसान भरपाई प्रदीर्घ कालावधीनंतर मागणी करण्याचा अधिकार संबंधितांना नसल्याबाबतचा महसूल व वनविभागाचा 26 ऑक्टोबर 2010 च्या शासन निर्णयाचा दाखला देत काम सुरू करण्यात आल्याचे राष्ट्रीय महामार्ग उपविभाग खारेपाटण यांच्याकडून सांगण्यात आले. यामुळेच तळेरे, कासार्डे-आनंदनगर, नाधवडे येथील काम पूर्ण झाल्यानंतर काही ठिकाणची प्रलंबित कामे पूर्ण झाल्यानंतर तळेरे-गगनबावडा प्रवास सुसाट होणार आहे.