

सावंतवाडी : जालना जिल्ह्यातील सराटी-अंतरवाली गावात मराठा समाजातील आंदोलकावर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा सावंतवाडी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी तीव्र निषेध करण्यात आला. आपल्या न्याय हक्कासाठी लढा देणार्या मराठा समाजावर एवढा लाठी हल्ला होऊन देखील समाजातील एकाही मंत्री, नेत्यानीं राजीनामा दिला नाही ही लाजिरवाणी बाब आहे. या घटनेचा सर्व स्तरातून जाहीर निषेध झालाच पाहिजे, असे सावंतवाडी तालुका सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांनी सांगितले. या निषेधाचे निवेदन नायब तहसीलदार संदीप सावंत यांना निवेदन सादर करण्यात आले.
जालना येथे आरक्षण तसेच आपल्या न्याय हक्कासाठी सराटी अंतरवाली गावांत मराठा समाजाच्या वतीने शांतते आंदोलन सुरू होते. हे आंदोलन दडपण्याच्या उद्देशान राज्य राखीव पोलिस दल व पोलिसांची फौज मागवून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचा निषेध करण्यासाठी मंगळवारी तहसील कार्यालयात समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत तहसील कार्यालयाकडे मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव जमले होते. यावेळी मराठा समाज आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. तालुकाध्यक्ष गावडे म्हणाले, समाजबांधव मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांततेच्या मार्गाने हे आंदोलन सुरू होते. मात्र, सरकारने आंदोलन दडपण्याच्या उद्देशाने अचानक एसआरपी व पोलिसांना बोलावून आंदोलकांवर अमानुष लाठी हल्ला केला. या घटनेचा समाज बांधवांनी गावागावांत शासनाचा निषेध केला पाहिजे. प्रसंगी रस्त्यावर उतरून एकजूट दाखवली पाहिजे. एवढी मोठी घटना घडूनही मराठा समाजाचे नेते, मंत्री यांनी राजीनामा दिलेला नाही ही शरमेची बाब आहे, असे सांगत, शासनाला या आंदोलनाची दखल घ्यावीच लागेल, असे सांगितले.
मराठा समाजाचे नेते विकास सावंत म्हणाले, या प्रकारा केवळ निषेध करून चालणार नाही, तर मराठा समाजाला न्याय हक्क मिळेपर्यंत हा लढा सुरूच ठेवला पाहिजे. राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारे-परब यांनी जालना येथे सुरू असलेले मराठा समाजाचे आंदोलन दडपण्याचा मानस सरकारचा होता, असा आरोप केला. यावेळी 'एक मराठा, लाख मराठा', 'आरक्षण आमच्या हक्काचे', 'जय भवानी जय शिवाजी' अशा घोषणा देत परिसर दाणाणून सोडला. नायब तहसीलदार संदीप सावंत यांना मराठा समाजाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात लाठी हल्ला करणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. कुडाळ येथे बुधवारी होणार्या जवाब दो आंदोलनात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गावडे यांनी केले.
बाळा गावडे, पुंडलिक दळवी, बाबू कुडतरकर, सी. एल. नाईक, शिवदत्त घोगळे, विलास जाधव, सतीश बागवे, प्रशांत कोठावळे, अपर्णा कोठावळे, संदीप गवस, उमा वारंग, सुधीर राऊळ, संतोष धुरी, गौरी गावडे, एल. एस. निचम, संतोष परब आदी उपस्थित होते.