

मळगाव : गणेशोत्सव कालावधीत मुंबईकर चाकरमानी प्रवाशांना सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर सेवा सुविधा देण्यासाठीचे नियोजन सावंतवाडी रेल्वे स्टेशन बैठकीत करण्यात आले.
मळगाव येथील सावंतवाडी रेल्वे स्टेशनला आगामी गणेशोत्सव कालावधीत मुंबईकर चाकरमान मोठ्या संख्येने दाखल होणार आहेत. सावंतवाडी, वेंगुर्ला तसेच दोडामार्ग या तालुक्यातील मुंबईकर चाकरमाने एकाच वेळी सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर उतरणार आहेत. त्या प्रवाशांना उपलब्ध करून दिलेल्या रेल्वे स्टेशन वरील मूलभूत सेवा सुविधांचा आढावा, या बैठकीत घेण्यात आला. त्यामध्ये सुधारणा करून अधिकाधिक चांगल्या सुख सुविधा प्रवाशांना कशाप्रकारे देता येतील याबाबत चर्चा करून नियोजन करण्यात आले. गणेशोत्सवासाठी येणार्या प्रत्येक प्रवाशाला योग्य ती सुविधा मिळावी, यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज राहणार आहे.
रेल्वे स्टेशनवर एकाच वेळी प्रवासी उतरणार असल्यामुळे गर्दी होणार आहे. त्याचेही नियोजन करण्यात आले. या बैठकीत रेल्वे प्रशासनाच्या विविध विभागांचा आढावा घेऊन त्या विभागांना तत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. सावंतवाडी रेल्वे स्टेशनला गर्दीच्या कालावधीत प्रवासांना कुठच्याही गैरसोयीला सामोरे जावे लागणार नाही याची खबरदारी प्रशासन घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
बैठकीला कोकण रेल्वेचे सुपरवायझर मधुकर मातोंडकर, सावंतवाडी रेल्वे स्टेशनचे सीनियर स्टेशन मास्तर दिनेश चव्हाण, स्टेशन मास्टर ए. आर. पवार, संकेत परब, रामचंद्र धनकुटे, एसटीबीए सगुण मातोंडकर, तुकाराम मांजरेकर, किरण राऊळ, राकेश रेडीज, दिनेश रेडीज, संतोष निरवडेकर, दिनेश काणेकर आदी उपस्थित होते.