

सावंतवाडी : देवसू-पारपोली मुख्य रस्त्यावर गुरुवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. या रस्त्यालगत असलेला सुमारे शंभर वर्षांपूर्वीचा जीर्ण वटवृक्ष अचानक कोसळला. या दुर्घटनेत रस्त्यालगत राहणारे साक्षी संतोष भेंडे यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सकाळी अचानक हा प्रचंड वटवृक्ष साक्षी भेंडे यांच्या घरावर पडला. वृक्षाच्या फांद्या आणि खोडाचा काही भाग घराच्या छतावर आणि भिंतींवर आदळल्याने सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेवेळी घरातील सदस्य बाहेर असल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
झाड रस्त्यावर कोसळल्यामुळे देवसू-पारपोली मार्ग दुपारपर्यंत वाहतुकीसाठी बंद होता. तसेच हा वटवृक्ष मुख्य वीज वाहिनीवर पडल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.
विशेष म्हणजे, हा वटवृक्ष प्राथमिक शाळेजवळ होता. मात्र, सकाळी ही घटना घडल्याने आणि रस्त्यावर वर्दळ नसल्याने संभाव्य धोका टळला.
घटनेची माहिती मिळताच देवसू-पारपोली सरपंच रुपेश सावंत, तलाठी संतोष धोंड, पोलिसपाटील प्रवीण सावंत यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जेसीबी मशीन मागवून रस्त्यावरून झाड हटवण्याचे काम सुरू केले. वृक्ष खूप मोठा आणि जड असल्यामुळे जेसीबीने तो बाजूला करताना मोठी कसरत करावी लागली. सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर वटवृक्ष रस्त्याच्या कडेला घेण्यात आला आणि दुपारनंतर वाहतूक सुरळीत झाली.
या मदतकार्यात विठ्ठल सावंत, बंड्या सावंत, सचिन सावंत, अमोल सावंत, सुरेंद्र देसाई, मंता सावंत, जनार्दन जाधव, सुनील सावंत, महेश सावंत, बाबुराव देऊसकर, ऊर्मिला सावंत, गजानन सावंत, काशीराम जाधव, वायरमन अमित राऊळ, पॉली डिसोजा यांच्यासह ग्रामस्थांनी सहभाग घेतला.