

Banda Flyover Cracks
सावंतवाडी : बांदा कट्टा येथे महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी, अपघात लक्षात घेता संबंधित विभागाकडून उड्डाण पूल बांधण्यात आला. ठेकेदाराने रंगरंगोटी करून वर्षभरापासून वाहतूक सुरु केली. मात्र, पहिल्याच पावसात पुलाच्या स्लॅबला तडे गेले आहेत. त्यामुळे पुलाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
गेल्या वर्षी साधारण नोव्हेंबर महिन्यात बांदा उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात झाली. त्यानंतर कामाचा दर्जाबाबत ठेकेदाराला विचारणा झाली. परंतु, अधिकाऱ्यांनी कामाच्या दर्जाबाबत कधीच विचार केला नाही. फक्त रंगरंगोटी करीत राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत थाटामाटात पुलाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा पुरावा पहिल्याच पावसाने दिला.
बिकानेर बेकरीच्या समोर बांदा उड्डाण पुलाच्या स्लॅबला तीन ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे मुसळधार पाऊस सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणात पाणी पाझरण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुमारे ७० कोटी खर्च झालेल्या पुलाच्या निकृष्ट कामास संबंधित शासकीय विभाग की ठेकेदार जबाबदार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.