BJP Shiv Sena Clash | सावंतवाडीत भाजप-शिवसेनेत राडा
सावंतवाडी : सावंतवाडी शहरात मंगळवारी सायंकाळी नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात शिवसेनेत आणि भाजपमध्ये राडा झाला. येथील प्रभाग क्रमांक नऊमधील बूथवर गाडी अंगावर घातल्याच्या कारणावरून शिंदे शिवसेनेने भाजप युवा नेते विशाल परब यांची गाडी अडवत चालकाला मारहाण केली.
त्यांनतर हा वाद वाढत जाऊन पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेले भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले आणि पोलिस ठाण्यातच एकमेकांना भिडले, त्यामुळे पोलिस ठाण्याचे वातावरण तंग बनले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना बाजूला केले. या राड्यामुळे नगरपालिका निवडणुकीत शांत सावंतवाडीला अखेर गालबोट लागले असून दोन्ही बाजूंनी तक्रारी आल्यास परस्पर विरोधी गुन्हे दाखलं करण्यात येतील अशी माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.
तर या प्रकरण नंतर तडजोड करण्यासाठी उशीरापर्यंत प्रयत्न सुरू होते. सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारी शेवटच्या दिवशी मतदान प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना भाजप व शिवसेना दोन्ही पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यात राडा झाला.
सायंकाळी 5वा प्रभाग नऊ मधील बूथ वर शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते व नगराध्यक्ष उमेदवार अॅड. निता कविटकर, भारती मोरे, या आढावा घेत असताना भाजप युवा नेते विशाल परब यांच्या गाडीचा ताफा तेथून भरधाव वेगाने जात होता, त्यातील स्कॉर्पिओ कारची हुलकावणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बसल्याने त्यांनी ती गाडी अडवली व चालक याला बाहेर काढत त्याच्या कारची तपासणी करण्यास सांगितले.
यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विशाल परब यांच्या चालकाला मारहाण केली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत त्या चालकाला सोडवून घेत अन्यत्र हलविले. यावेळी त्या ठिकाणी जिल्हाप्रमुख संजू परब दाखल झाले, त्यांनी यावेळी पोलीस प्रशासनाला धारेवर धरले. या कारची तपासणी करण्याची मागणी केली. यावेळी पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये भाजपचे झेंडे अढळून आले.
शिवसेनेचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले होते त्यामुळे वातावरण तंग बनले. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर फौजफाटा मागवत कार्यकर्त्यांना तेथून हटवले. हा राडा झाल्यावर भाजपचे विशाल परब यांनी चालकाला मारहाण झाल्याबाबत रीतसर तक्रार देणार असल्याचे सांगत पोलीस ठाणे गाठले.
त्याचवेळी काही क्षणातच शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब पोलीस ठाण्यात आले. यावेळी पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यांनतर पोलीस निरीक्षक यांच्याशी परब यांनी चर्चा करत युपी बिहारची माणसे आणून राजरोस पणे पैसे वाटप होत आहे, त्यांचे रेकॉर्ड तपासावे, त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत असे सांगितले. बूथ वर अंगावर गाडी घालण्याचा प्रकार झाला त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जावेत अशी मागणी केली.
त्यानंतर काही वेळातच पोलीस ठाण्यात भाजप कार्यकर्ते दाखल झाले. त्यामध्ये शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन ते एकमेकांना भिडले त्यामुळे पोलीस ठाण्याचे वातावरण काही काळ तंग बनले होते. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना वेगळे केले. यावेळी मोठा पोलीस फौजफाटा होता.
त्यानंतर भाजपचे विनोद राऊळ, मनोज नाईक कार्यकर्त्यासह दाखल झाले त्यांना पोलिसांनी अटकाव केला असता त्यांची पोलिसांसमवेत बाचाबाची झाली. अखेरीस त्याना पोलिसांनी वेगळ्या रूम मध्ये बसविले. पोलीस ठाण्याबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आवाहन करत निघून जाण्यास सांगितले.
सावंतवाडीच्या शांततेला गालबोट
या राड्यामुळे एवढी वर्षे शांत असलेल्या सावंतवाडीला गालबोट लागले आहे. भाजपचे विशाल परब व विनोद राऊळ, मनोज नाईक, तर शिवसेनेचे संजू परब पदाधिकारी ठाण मांडून होते. पोलिसांनी दोघांचे म्हणणे ऐकुन घेत तक्रारी घेण्याचे आश्वासन दिले. त्यांनतर सामंजस्याने हा प्रकार मिटविण्याचे आवाहन केले.
यावेळी दोन्ही पक्षांचे पदाधिकारी पोलीस ठाण्यात उशीरापर्यत उपस्थित होते. सकाळी प्रभाग सात मध्ये झालेल्या धक्काबुक्की नंतर हा वाद आणखीनच वाढत गेला त्याचे पर्यवसान या राड्यात झाले. उशिरापर्यत कोणावरही गुन्हे दाखल करण्यात आले नव्हते. पोलोस ठाण्यात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही कार्यकर्ते थोड्या वेळाने शांत झाल्याने निघून गेले तर पदाधिकारी उशिरा पर्यंत उपस्थित होते.

