

मालवण: मी कुडाळ, मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर भाजपकडून आपणास प्रवेशाबाबत ऑफर होती. परंतु ती मी स्वीकारली नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी सोडल तर देव मला माफ करणार नाही. त्यामुळे त्यांना मी कधीही सोडणार नाही. आता यापुढे तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आपणास बघुनही घेणार नाहीत. त्यांचा स्वभाव मला माहीत आहे, असे शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
आ. नीलेश राणे म्हणाले, मी फक्त रवींद्र चव्हाण यांच्याबाबतच बोलत आहे कारण ते चूकत आहेत. आपण कोणाबद्दल बोलतोय याचे भान ठेवलं पाहिजे आणि मी भान ठेवून बोलणारा माणूस आहे. तरी मी ही इथल्या मंडळींवर टीका केलेली नाही. मला माहित आहे. 3 तारीखनंतर आपल्याला एकत्र यायचं आहे. मग मी का करू त्यांच्यावर टीका? असेही निलेश राणे म्हणाले. भिजलेला माणूस पावसाला घाबरत नसतो. पण तुम्ही बोलताना भान ठेवा.
मी कोणाच्या सांगण्यावरून बोलतोय हे सत्य नसल्याचे आ. राणे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, मी एकटा असतो तर एवढा बोललोही नसतो. आज मी इथे ताकद सांगायला बसलेलो नाही. योग्य वेळी माझी ताकद दाखवेन. आता काही ताकद दाखवण्याची वेळ नाही, सर्व आपलेच आहेत. रवींद्र चव्हाणही आपलेच आहेत. पण रवींद्र चव्हाणांनी ताकद दाखवली तर आम्हालाही दाखवावीच लागेल, असे आ. राणे म्हणाले.
बळीचा बकरा म्हणजे काय असतो? एवढा दूधखुळा वाटतो का मी तुम्हाला? मला कोण काय सांगेल करायला? मी कोणाचं ऐकेन का? बकरा कोणाचा होतो ते 3 तारीखला कळेल. एकटा असतो तर मी एवढा बोलू शकलो असतो का? असाही सवाल आ. नीलेश राणे यांनी केला.
नीलेश राणेंचा बळीचा बकरा केला जातोय : नितेश राणे
शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीने नीलेश राणे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल बोलतायत, अजून कोणच नेता त्याचं समर्थन करत नाहीये आणि नावपण घेत नाहीये. म्हणून मी त्या दृष्टीकोनातून बोललोय की नीलेश राणेंचा बळीचा बकरा केला जातोय. ती काही राजकीय टीका नव्हती. त्याकडे कसं पाहावं हे त्यांनी ठरवावं.
मी फक्त त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला, अशी बाजू नितेश राणे यांनी मांडली आहे. तर राणेंच्या कुटुंबाचं रक्त हे भगवं आहे, हे निलेशजींना चांगल्या पद्धतीने माहीत आहे. म्हणून आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते मंत्री नितेश राणे यांनी दिली. ही निवडणूक आम्ही जनतेसाठी लढवतोय. कोणी काय बोलतंय त्यासाठी आम्हाला 2 तारखेनंतर वेळ द्या, आम्ही त्याची उत्तरं देऊ, मंत्री नितेश राणे म्हणाले.