

सावंतवाडी : विधानसभा सावंतवाडी मतदारसंघातील वीजसमस्यांच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आ.दीपक केसरकर यांनी प्रशासकीय यंत्रणेची शनिवारी बैठक घेतली. यावेळी महावतरणच्या कार्यपद्धतीबाबत त्यांनी जोरदार नाराजी व्यक्त केली.‘तुम्ही ग्राहकांकडून वीज बिले वेळेत घेता, मग त्यांना सेवाही वेळत द्या’ अशा शब्दात आ. केसरकर यांनी महावितरणच्या अभियंत्यांची कानउघडणी केली. येत्या आठ-दहा दिवसात मतदारसंघात वीज सेवा सुरळीत करा, अन्यथा जनता तुम्हाला माफ करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
सावंतवाडी नगरपालिका सभागृहात ही बैठक झाली. दोडामार्ग येथील सहा. अभियंत्यांनी उन्हाळ्यात वीज वाहिन्यांवरील झाडाची साफसफाई वेळेत न झाल्याने या समस्या निर्माण होत असल्याचे बैठकीत कबूल केले. तोच धागा पकडून आ. केसरकर यांनी अधिकारी व कर्मचार्यांना कानपिचक्या दिल्या. आपण लोकांना चांगली सेवा द्यायची आहे. आपण ग्राहकाला वेळेवर वीज बिल देतो, त्याने वेळेत भरणा न केल्यास त्याच्याकडून विलंब आकार घेतो, कायद्यानुसार त्याचा वीज पुरवठाही खंडीत करतो. या प्रमाणेच ग्राहकाला वेळेत सेवा देणे ही सुद्धा आपली जबाबदारी आहे, असे खडेबोल त्यांनी वीज अधिकार्यांना सुनावले.
पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी वीज सेवा सुरळीत होत नाही. त्यामुळे लोक संतप्त आहेत. लोकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका, अन्यथा त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, असा इशाराही आ. केसरकर यांनी वीज अधिकार्यांना दिला. खरेतर मी ग्राहकांच्या उपस्थित ही बैठक घेणार होतो. परंतु तुम्हाला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागू नये, यासाठी आपण प्रथम तुमच्याशी चर्चा करण्याचे ठरवले. आता पुढील 8-10 दिवसात मला सकारात्मक परिणाम दिसायला हवेत, अशी सक्त सूचना त्यांनी वीज अधिकार्यांना दिली.
वेंगुर्ला येथील अंडरग्राऊंडसाठी उभारलेल्या पॅनलचा त्रास नागरिकांना होत असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी केला. अधिकार्यांनी दिशाभूल केल्याने श्री. वालावलकर आक्रमक झाले. ट्रान्सफॉर्मरसाठी पैसे मंजूर होऊन ते का पूर्ण होत नाहीत? कोट्यवधी रूपये आम. केसरकर यांनी दिलेले असताना काम होत नसल्याची तक्रार त्यांनी केली. अधिकार्यांना ग्राऊंडवरची माहिती नाही असे ते म्हणाले. आम. केसरकर यांनी मध्यस्थी करत यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तसेच सावंतवाडी रेल्वे स्थानक येथील ट्रान्सफॉर्मर का बदलला नाही ? असा सवाल केसरकर यांनी केला.
सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, महावितरणचे कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख, सिंधुदुर्ग बँक संचालक विद्याधर परब आदी उपस्थित होते.
कोकणातील लोक संयमी आहेत. मात्र त्यांच्या सयंमाची परीक्षा पाहू नका, तुम्हाला निधी, साधन, सामुग्री कमी पडल्यास मला सांगा. पण, लोकांचे हाल करू नका, असे निर्देश आम.दीपक केसरकर यांनी वीज अधिकार्यांना दिले.
सावंतवाडी शहरात उद्भवणार्या समस्यांबाबत श्री. केसरकर यांनी उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांना विचारणा केली. शहरी भागात सतत विद्युत पुरवठा खंडित होण्याची कारणे काय? असा सवाल त्यांनी केला. तसेच अंडरग्राऊंड वीज वाहिन्यांचा प्रस्ताव मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. अंडरग्राऊंड योजना झाल्यावर या गोष्टी थांबतील असे केसरकर म्हणाले. तर, शहरात पुन्हा सतत लाईट जाणार नाही याची काळजी घ्या असे निर्देश दिले. आंबोली, चौकुळ आदी दुर्गम भागात टीम कार्यान्वित ठेवण्याच्या सूचना केल्या.