

Savdav Waterfall Crowd
नांदगाव : अल्पावधीत महाराष्ट्रासह परराज्यात प्रसिद्ध झालेला मुंबई गोवा महामार्गापासून अवघ्या सात की.मी. अंतरावर असणारा कणकवली तालुक्यातील निसर्गरम्य सावडाव धबधबा पहिल्यांदाच मे महिन्यात प्रवाहीत झाल्यानंतर सावडाव धबधब्यावर वर्षा पर्यटन सुरू झाले आहे. जिल्हासह राज्य व परराज्यातील पर्यटकांनी रविवारच्या दिवशी उच्चांकी गर्दी केली होती. सावडाव धबधबा परिसरात दमदार पडणा-या पाऊसामुळे धबधबा प्रवाहित झाल्याने वर्षा पर्यटनांसाठी सावडावकडे यापुढेही शनिवार, रविवार व विकेंडला वर्षा पर्यटकांची पाऊले वळू लागणार आहे. सिंधुरत्न योजनेतून धबधब्याचे कायापालट केला गेला असून यंदा धबधब्याचा नवालूक पर्यटकांना मोहित करणारा ठरत आहे. यामुळे हिरवीगर्द झाडी, हिरव्या गार निसर्गरम्य वातावरणातून खळखळ वाहणारा धबधबा पर्यटकांना एक अविस्मरणीय क्षण अनुभवायला अनेक पर्यटकांनी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत मोठी गर्दी केली होती.
मान्सूनपूर्व पाऊस मे महिन्यातच धडकल्याने जिल्हातील अनेक धबधबे प्रवाहीत झाले आहेत. जिल्हातील आंबोली नतंर सुरक्षित धबधबा म्हणून वर्षा पर्यटनासाठी जिल्हयासह राज्यातून व इतर राज्यातील अनेक पर्यटक मोठया संख्येने वर्षा पर्यटनासाठी सावडावला पसंती देतात. डोंगर पठारावरुन पसरट कड्यावरुन खाली कोसळणारा गर्द हिरव्या झाडा झुडपांतला आनंदाचं उधाणच आलेला सावडाव धबधबा कोसळू लागला असल्याने धबधब्याखाली आंघोळीचा अनेक पर्यटक आनंद लुटताना दिसत आहेत. यामुळे मे महिना ते सप्टेंबर पर्यत सावडाव धबधब्यावर पर्यटकांची संख्या दररोज वाढणार असून रविवार व सुट्टीच्या दिवसांसह अन्य दिवशीही पर्यटक वर्षा पर्यटनासाठी गर्दी करणार आहेत.
यामुळे या रविवारी सावडाव धबधबा परीसर पूर्णपणे पर्यटकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाला होता. तर पर्यटकांच्या वाहनांनी परीसर व्यापून गेला होता. या धबधब्याची निर्मिती झाल्यानंतर लोखंडी रॅम्प, पाय-या, बाधरूम, टॉयलेट, रस्ता अशा प्रकारे पयाभुत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. आता मात्र मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध झाल्याने पर्यटकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. त्याचबरोबर पर्यटकांना नाष्टा व जेवनाची सोय व्हावी यासाठी स्थानिकांनी दुकाने मांडून पर्यटकांची सोय केली आहे. सध्या पाच ते सहा दुकाने मांडून वर्षा पर्यटकांची व्यावसायिक सोय करीत आहेत. त्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
यंदा पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे कणकवली पोलीस स्टेशनच्या वतीने दोन कर्मचारी देत पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. सावडाव धबधबा ठिकाणी प्रवेशद्वारावर अभ्यंगत कर रू.१० ग्रामपंचायती मार्फत लावला जात असून वाहतूक कोंडी यावर तोडगा म्हणून पार्कींगची व्यवस्थेसह पार्कींग करही लावला जात आहे. सावडाव धबधबा ठिकाणी ग्रामपंचायत व शासनाच्या विविध योजनेतून जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न असून सर्व पर्यटकांनी दरवर्षी प्रमाणे स्वच्छता राखत आनंद लुटावा व सहकार्य करावे असे आवाहन सरपंच आर्या वारंग,उपसरंच दत्ता काटे, ग्रामपंचायत अधिकारी मधुरा भुजबळ यानी केले आहे.
सावडाव धबधबा हा निसर्गरम्य स्वरचित असल्याने अनेक पर्यटकांना आकर्षित करतो. यामुळेच सध्या सिंधुरत्न योजनेतून साठ लाख रूपये खर्च करून धबधब्याला नवालुक देण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सध्या सेल्फी पाँईट, स्वागत कमानी, चेंजिंग रूम, बाथरूम, टॉयलेट, परीसरात पेवर ब्लॉक, धबधब्यावर जाणा-या पाय-या व रॅम्प, बैठक व्यवस्था व रंगरंगोटी अशी कामे पूर्ण झाली असून इतर कामे येत्या काळात पूर्ण होणार आहेत.
सावडाव धबधब्याच्या शेजारीच सध्या जलसंधारण विभागाच्या सावडाव धरण प्रकल्पा अंतर्गत काम सुरू असल्याने येत्या काळात हे धरण पूर्ण होणार आहे. यामुळेच पाणीसाठा झाल्याने परीसरातील गावाना याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर याच धरणाचे पाणी पुढे सावडाव धबधब्याला वळवण्यात येणार असल्याने वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधब्याबरोबर कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा भविष्यातील बारमाही पर्यटनासाठी सज्ज होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावडाव धबधबा कणकवली पासून अवघ्या १६ किमी अंतरावर तर मुंबई गोवा महामार्गावरील सावडाव फाट्यावरून ७ किमी अंतर असून मुंबई गोवा महामार्गासह गगनबावडा घाट व फोंडाघाट घाट मार्गे या धबधब्यावर पर्यटक पोहचू असलेला सावडाव धबधबा अनेकांना आकर्षित करतो.