

मडुरा : सातुळी -बावळाट रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे प्रवाशांसाठी संकट बनले आहे. रस्त्याच्या या दुरावस्थेमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक, वाहनचालक तसेच पर्यटकांतून हाच काय विकास? असा सवाल विचारला जात आहे.
सातुळी-बांदा मार्गावरून दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी व पर्यटक प्रवास करतात. दाणोली, सातुळी, बावळाट, सरमळे, विलवडे व बांदा या गावांना जोडणार्या या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. काही ठिकाणी रस्त्याचे कामे सुरू असले तरी ते संथ गतीने चालू असून कोणतेही ठोस नियोजन दिसून येत नसल्याचे कोल्हापूर वरून गोव्याला जाणार्या पर्यटकांनी सांगितले. खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात हे खड्डे पाण्याने भरून अधिक धोकादायक ठरत आहेत.
लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात विकासाच्या नावाखाली निधी खर्च केला जातो, मात्र प्रत्यक्षात याचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचतो काय असा सवाल करत हाच काय विकास? असे बोलले जात आहे.
आंबोली व गोव्याला ये जा करण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. पर्यटनवाढीच्या गप्पा मारणार्यांसाठी ही स्थिती डोळे उघडून पाहण्यासारखी आहे. जिल्हा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.
गुरुदास गवंडे, मनसे, सावंतवाडी मतदारसंघ सचिव